Thursday, June 30, 2022

डॉक्टर्स डे निमित्त प्रासंगिक : वैद्यकीय व्यवसायातील चुरस..!!

(भाग एक)


१९९४ साली मी व माझ्या पत्नीने पुण्यातील बिबवेवाडीत रुग्णालय सुरु केले. उद्घाटनाचे चे आमंत्रण देण्यासाठी आम्ही बिबवेवाडीतील सर्व डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी एका डॉक्टरांनी मला विचारले, "अरे तुझ्या शेजारी एक एम. बी. बी. एस. बाई बालरोग तज्ञ म्हणून काम करतात आणि त्यांचा सर्जन नवरा गायनॅकॉलॉजिस्ट सारखी ऑपरेशन्स करतो. त्यांच्या शेजारच्या तुझ्या रुग्णालयात तुझा बालरोगतज्ञ म्हणून व तुझ्या पत्नीचा स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ म्हणून टिकाव कसा लागणार? रुग्णालय काढण्यापूर्वी थोडा विचार करायचा ना की आपली स्पर्धा कोणाशी आहे?

मी म्हणालो की माझी स्पर्धा माझे बालरोग शास्त्रातील गुरु डॉ. अजेय जोशी यांच्याशी आहे आणि पत्नीची स्पर्धा पुण्यातील अग्रगण्य स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेधा पाटणकर यांच्याशी आहे व आम्ही दोघांनी त्या दोघांच्या रुग्णालयांतच कामाचा अनुभव घेतला आहे. झाले, पाहता पाहता वावटळीसारखी ही चर्चा गावभर पोचली. डॉ. अजेय जोशी सरांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले की तू असे म्हणालास का? मी म्हणालो हो. उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी येणार्‍याला भिती दाखवणार्‍या त्या मूर्ख डॉक्टरांचा असला झटका बसला की त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता..!! 

सरांनी माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, आत्ता माझे नाव घेतलेस ते ठीक झाले, पण यापुढे असे प्रसंग येतील तेंव्हा इतरांची नावे न घेता बोलत जा, कारण व्यवसायात कोण मित्र आणि कोण शत्रू हे समजायला खूप दिवस जातात. स्वत:हून कोणाचे शत्रुत्व निर्माण करू नकोस कारण तुमच्या पिढीला जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल असे मला वाटते.

सर उद्घाटनाला आलेच पण त्यांतरही माझ्याकडून बरा न झालेला रुग्ण त्यांच्याकडे गेल्यास रुग्णाला माझ्याकडे परत पाठवले व मला सांभाळून घेत रुग्ण बरा होण्यासाठी योग्य दिशा दाखवली. डॉ. पाटणकरांना उद्घाटनाला यायला जमले नाही परंतू त्यानंतर मुद्दाम येऊन त्यांनी आमचे अभिनंदन केले. आमचे रुग्णालय सुरु झाल्यानंतर वर्षभर माझी पत्नी त्यांच्याकडे  काम करत होती कारण सुरुवातीच्या काळात एकाने तरी थोडे पैसे मिळवणे गरजेचे होते.

.... क्रमश:

डॉ राजीव जोशी बालरोगतज्ञ, वैद्यकीय संगणकशास्त्र तज्ञ.  विधितज्ञ आणि न्यायवैद्यकीय सल्लागार

Monday, November 1, 2021

विमा कंपन्यांचा धंदा

 २०१४ साली मी लिहिलेला लेख येथे पुन: देत आहे. तो अवश्य वाचावा. 

हा लेख लिहिल्यानंतर अनेक रुग्णांच्या बिलांची रक्कम इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळवून देण्यासाठी मी मदत केली. त्या दरम्यान समजलेल्या गोष्टी खालील प्रमाणे

  1. विमा कंपनीमधे २५% "कारकून" प्रथम दावा अमान्य करण्याचे काम करतात. त्यासाठी थोडेफार पटेल असे कारण शोधणे आणि दावा अमान्य करणे ह्याच्यासाठी त्यांना पगार मिळतो. ५०% रुग्ण हे मान्य करुन स्वत: पैसे भरतात आणि गप्प बसतात. 
  2. उरलेले ५०% रुग्ण विमा कंपनीशी पत्रव्यवहार करतात. त्यांचा दावा काही प्रमाणात मान्य करुन साधारण पणे ५०% रक्कम मान्य करणे आणि ५०% अमान्य करणे हे विमा कंपनीतील थोडे वरिष्ठ असे २५% "एक्झिक्युटिव्ह" करतात. साधारण ५०% रुग्ण मंडळी हे मान्य करतात. थोडक्यात इथपर्यंत फक्त १२.५% परतावा कंपनी कडून दिला जातो.
  3. एकूण रुग्णांच्या २५% पुन्हा एकदा कंपनीला विनंती पत्र लिहितात. त्यांचा दावा ७५% पर्यंत मान्य करण्यासाठी एक डॉक्टरांची फौज असते. ती वैद्यकीय कारणे दखवून २५% दावा अमान्य करते. निम्मे हे मान्य करतात. इथपर्यंत १२.५% * ७५% =  ९.३७५+१२.५= २१.३७५% परतावा दिला जातो.
  4. यातील उरलेले निम्मे एक खरमरीत पत्र पाठवतात व कोर्टात जाण्याची धमकी देतात. यांचा संपूर्ण दावा मान्य होतो,म्हणजेच फक्त १२.५% रुग्णांना पूर्ण रक्कम मिळते. २१.३७५+१२.५=३३.८७५ किंवा घटकाभर आपण एक त्रितियांश धरु. 
  5. १०० टक्के रुग्णांकडून दरवर्षी प्रिमियम घेताना उत्तम सर्व्हिस ची आश्वासन द्यायचे. त्यातील १०% रुग्ण आजारी पडतात. त्यातील फक्त एक त्रितियांश परतावा द्यायचा हा विमा कंपन्यांचा धंदा आहे. 

यातून काढलेला मार्ग हा कॅशलेस विमा आहे परंतू त्यात यापेक्षा जास्त फसवणूक आहे. प्रत्यक्षात विम्याचा करार हा रुग्ण व विमा कंपनीमधील आहे, त्यात रुग्णाल्य कोठेच येत नाही. 

समजा रुग्णाचा विमा ३,००,००० आहे, आणि त्याचे  बिल २,५०,००० झाले तर रुग्ण आनंदाने त्यावर सही करतो. प्रत्यक्षात विमा कंपनी आणि रुग्णालयाच्या करारानुसार रुग्णालयाला फक्त  १,२५,००० दिले जातात. अमेरिकेमधे याची माहिती रुग्णाला देऊन त्याने त्यावर सही केल्यावरच विमा कंपनीला पैसे देतात.  त्यामुळे रुग्णाच्या विम्यातील फक्त १,२५,००० कमी होऊन पुढील आजाराला १,७५,००० शिल्ल्क राहतात. आपल्याकडे फक्त ५०,००० उरतात. रुग्ण परत रुग्णालयात आला की त्याच्याकडून रुग्णाल्य वसूली करायला मोकळे..!!  

यापेक्षा वाईट म्हणजे रुग्ण पाठवतो असे आमिष दाखवून विमा कंपन्या कमी पैश्यांमधे उपचार करायला रुग्णांना भाग पाडतात. तेव्हड्या पैशात उपचार करण्यास तज्ञ डॉक्टर तयार नसल्यास रुग्णाल्याच्या पेशंटना अन अनुभवी / शिकाऊ / रेसिडेंट डॉक्टरांकडून  उपचार दिले जातात. त्यांच्या मासिक पगारात अनेक रुग्णांच्या उपचारांचे पैसे रुग्णालयाला मिळतात. रुग्णाला हे कधीच कळत नाही. अश्या पध्दतीने रुग्णाच्या अज्ञानाचा फायदा घेउन विमा कंपन्या भरपूर लूट करत आहेत. 

आय. एम. ए. च्या मेडिकोलीगल सेल चे प्रमुख व मॅरेथॉन पळणारे ७० वर्षीय डॉक्टर तळजाईवर पडले आणि मांडीच्या  हाडाचे फ्रॅक्चर झाले. १,२५,००० बिलाची रक्कम देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ केली. मांडीत बसवलल्या स्क्रूची किंमत जास्त वाटते असे सांगून खरेदी  बिल मागितले. रुग्णालयाने एका वेळी १०० स्क्रू खरेदी करतो असे सांगून स्क्रूचे बिल देण्यास नकार दिला. शेवटी रुग्णालयाने त्या बिलाची झेरॉक्स आणि पूर्ण किमतीला १०० ने भागून येणारी किंमत असे वेगळे पत्र दिले. त्यानंतर विमा कंपनीने ७५% पैसे देण्याची तयारी दाखवली.  शेवटी विमा कंपनीला ग्राहक न्यायालयात जातो असे सांगीतल्यावर  २ तासात पूर्ण रक्कम बॅकेत जमा झाली.

माझे व माझ्या पत्नीचे करोनाचे बिल विमा कंपनीने देण्यास नकार दिला.  पत्र पाठवल्यावर  फिजिशियनचे पैसे कापून तपासण्यांचे व औषधांचे बिल दिले. डॉक्टर  सहसा डॉक्टरांकडून पैसे घेत नाहीत असे कारण दिले. परत खरमरीत पत्र पाठवून डॉक्टरांना दिलेल्या चेकची झेरॉक्स आणि  ते पैसे हॉस्पिटलच्या खात्यातून गेल्याची नोंद दाखवली आणि मग पूर्ण पैसे  आमच्या खात्यात जमा झाले.

अशी ही साठा उत्तराची विमा कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..!!

Tuesday, October 19, 2021

सवाई गंधर्व मोहोत्सवातील व्यवसाय


आम्ही रेणुकास्वरुप शाळेशेजारीच दत्तकुटीत रहात होतो. या शाळेत दरवर्षी सवाई गंधर्व मोहोत्सव साजरा होत असे. तीन रात्री हा संगीताचा कार्यक्रम होई आणि शेवटच्या दिवशी पहाटे पहाटे भीमसेन जोशी यांच्या गायनाने त्याची सांगता होत असे. या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळणे ही संगीतात खूप तपस्या करण्याची पावतीच समजली जात असे. गाणे ऐकण्यासाठी मात्र संगीतातील दर्दी व्यक्तींपासून ते आपल्याला गाणे किती समजते हे दाखवण्यासाठी शाल घेऊन मिरवणार्यांपर्यंत सर्व प्रकारच्या व्यक्ती हजेरी लावत. आम्ही शेजारी रहात असूनही संगीतचा थोडासुध्दा गंध नव्हता. पण त्या आवारात असलेल्या बटाटेवड्यांच्या स्टॉलवरुन भजी आणण्यासाठी मात्र आम्ही हजेरी लावत असू..!!

त्यावेळी आमच्या वाड्यात सुध्दा कोणाकोणाचा चहा कॉफीचा स्टॉल असे. मी आठवीत, एक भाऊ सहावीत आणि दुसरा भाऊ पाचवीत असताना आमची व सवंगड्यांची चर्चा झाली की आपण तेथे चहा, कॉफी व बटाटेवड्यांचा स्टॉल का टाकू नये? आई वडिलांना परवानगी विचारली असता ते म्हणाली की आजीला विचारा, कारण ती वाड्याची मालकीण आहे.

मग आम्ही आजीकडे गेलो. ती म्हणाली की जे कोणी असे स्टॉल लावतात ते तिला ३०० रुपये भाडे देतात, तेव्ह्डे तुम्ही द्या, म्हणजे मी तुम्हाला परवानगी देईन. आम्ही म्हणालो आम्ही कुठून पैसे देणार? त्यावर ती म्हणाली की व्यवहार चोख असायला हवा. पैसा नाते जोडतो आणि पैसाच नाते तोडतो. त्यामुळे तुम्ही मला पैसे दिलेत की माझी काही हरकत नाही, नाहीतर मी दुसर्यांना जागा देईन. आमचे सवंगडी तर फारच नाराज झाले.

मग आम्ही वडिलांना विचारले की सख्खी आजी भाडे मागते म्हणजे काय? ते म्हणाले की हा व्यवहार आहे. मी तुम्हाला ३०० रुपये देतो, आणि तुम्हाला स्टॉल चालवून नफा झाला की तुम्ही मला पैसे परत द्या. आम्ही म्हणालो ठीक आहे. मित्रांना हे काही फारसे पटले नाही पण त्यातील चौघांनी आपापल्या घरी हे सर्व सांगून १०० रुपये प्रत्येकी आणले आणि आणि आमचे तिघांचे प्रत्येकी १०० रुपये जोडून खरेदी साठीचे भांडवल उभे राहिले.

त्यातून आम्ही जोंधळ्यापासून लाह्या करुन घेतल्या व त्याची प्लॅस्टिकची पाकिटे तयार केली. आगाउ रक्कम भरुन १० लिटर दुधाची तजवीज केली, भाडे देऊन २५ कपांचे दोन थर्मास, कप बश्या व टेबले मिळण्याची व्यवस्था केली. साखर, कांदे, बटाटे व मसाल्याचे पदार्थ, तेल, डाळीचे पीठ इत्यांदींची खरेदी केली. वडे तळण्यासाठी मोठी कढई, झारे व गॅसची शेगडी घेऊन येईल असा आचारी शोधला व त्याच्याशी व्यवहार ठरवला. या सर्वांमधे आई वडिलांचे मार्गदर्शन होतेच. पण सर्व काम आम्ही मित्र मित्र करत होतो. चॉकलेट, गोळ्या, आणि सिगारेटी सुध्दा ठेवायचे ठरले कारण शाल घेऊन मिरवणारे धूर सोडत बोलताना आम्ही बघितले होते..!!

ज्या दिवशी सवाई गंधर्वाच्या मोहोत्सवाची सुरुवात होणार होती त्या दिवशी सकाळी लवकर उठून बटाटे उकडले आणि त्याची साले काढून ठेवली कारण त्यानंतर शाळा होती. शाळेतून परत आल्यावर बटाटे कुस्करुन त्यामधे परतलेला कांदा घालून बटाटेवड्यांचे सारण तयार झाले. कांदा चिरुन कांदा भज्यांची तयारी झाली. संध्याकाळी टेबले लावून त्यावर कप बश्या मांडल्या. आचार्याने भट्टी लावली व पहिला चहा तयार झाला. थर्मास भरुन टेबलवर आला व बटाटेवड्यांचा पहिला घाणा कढईत गेला.

चहा, कॉफी, बटाटेवडे भजी अश्या आरोळ्या आम्ही द्यायला लागलो आणि एके एक करुन गिर्हाईक यायला लागले.!! लोक चहा गार लागतो म्हणू लागले. मग आईने युक्ती सुचवली की कप बशी विसळून झाले की गरम पाण्यात बुडवून ठेवा. ही मात्रा लागू पडली.. गरम चहा साठी गर्दी वाढली. !!

चहा बरोबर सिगारेट आहे का अशी चौकशी सुरु झाली आणि बघता बघता आमच्या कडील सिगारेट संपल्या. मग मी सायकल घेऊन जवळील पानवाल्याकडे गेलो तर पठ्याने पाकिटाचा भाव वाढवला होता. थोडे दूर गेल्यावर मात्र नेहमीच्या भावात सिगारेटची ५ पाकीटे मिळाली. परत आल्यावर सगळ्यांना हे सांगीतले तेंव्हा आपणही सिगारेटचा भाव वाढवूया असे ठरले. २५ पैशांची सिगारेट लोक ५० पैशांना विकत घेत होते कारण इतर कोणाकडेही सिगारेट नव्हती.!

रात्री बारा पर्यंत आमच्याकडील दूध, साखर, बटाटेवडे, कांदाभजी आणि सिगारेटी सर्व संपल्या होत्या..!! आमच्या गल्यात १००० पेक्षा जास्त रुपये साठले होते. दुसर्या दिवशी पहाटे उठून मंडईत गेलो. दुप्पट बटाटे, कांदे, इत्यादी पदार्थ आणि २० लिटर दूध आणि सिगारेटची पंचवीस पाकिटे खरेदी केली. बटाटे उकडून झोपलो कारण रात्री जागरण झाले होते. उठल्यावर बटाटे सोलणे, कांदे कापणे, परतणे असा कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी परत स्टॉल लागला. रात्री दोन पर्यंत सर्व पदार्थ संपले. सिगारेटाची किंमत रात्री दहा पर्यंत २५ पैसे, १२ पर्यंत ५० पैसे आणि शेवटपर्यंत ७५ पैसे ठेवली. दोन पाकिटे शिल्लक राहिली. गल्यात होते २००० पेक्षा जास्त रुपये..!!

तिसर्या दिवशी आत्मविश्वास वाढला होता. अजून जास्त सामान खरेदी केले. त्या रात्री आम्ही २००० कप चहा, ५०० कप कॉफी, ३० पाकिटे सिगारेट, आणि भजी व बटाटेवडे पहाटे ४ वाजेपर्यंत विकत होतो. शेवटची ५ सिगारेटची पाकिटे १ रुपयाला एक सिगारेट या भावाने विकली. सर्व आवराआवरी करेपर्यंत पहाटेचे पाच वाजले आणि भीमसेन जोशी गायला बसले..!! त्या दिवशी पहिल्यांदा भीमसेन जोशींचे अभंग ऐकले, तारवटलेल्या डोळ्यांनी ..!!

सकाळी आचार्याला त्याचा मोबदला दिला, वडिलांना त्यांचे पैसे परत दिले आणि मिळालेले पैसे ७ जणांमधे विभागून घेतले. तीन दिवसांच्या कष्टांनंतर प्रत्येकी ५०० रुपये नफा झाला होता. कष्टांचे मोल मिळाले पण जे व्यवहार ज्ञान मिळाले ते आयुष्यभर उपयोगी पडले.

मी एम. बी. बी. एस. च्या प्रथम वर्षाला असताना वडिलांचे एक डॉक्टर मित्र सवाई गंधर्व मोहोत्सवाला आले होते. ते रात्री चहा साठी आमच्या स्टॉल वर आले. मला पाहून म्हणाले "तू काय करतोस इथे"? मी म्हणालो, काका, आम्ही गेली पाच वर्ष हा स्टॉल चालवतोय. त्यांनी सकाळी सकाळी वडिलांना फोन केला. ते म्हणाले, "अरे तुझा मुलगा डॉक्टर होणार आहे. त्याला चहा कॉफी विकायची परवानगी कशी देतोस? लोक काय म्हणतील?" झाले. पुढच्या वर्षीपासून आम्हाला स्टॉल बंद करायला लागला...

भीमसेन जोशींचे ते अभंग आजही कानावर पडले की आठवतो लहानपणी पुरी ५ वर्षे चालवलेला चहा, कॉफी, बटाटेवडे, कांदाभजी आणि सिगारेट स्टॉल..!! आणि आठवतो तो रात्रीत सात आठ कप चहा पिणारा, आमच्यावर चिडत चिडत वाढत्या दराने सिगारेट खरेदी करणारा, भगवा झब्बा आणि फेडेड जीन असा वेश परिधान करून खांद्यावर शबनम घेऊन गाण्याचा मनमुराद आनंद लुटणारा; रसिकाच्या रुपात व्यवहारज्ञान, विपणन, अर्थशास्त्र आणि बरेच काही शिकवत आमच्या कष्टांना दाद देणारा चोखंदळ ग्राहक.!!

डॉ. राजीव जोशी.

Wednesday, October 6, 2021

आपली किंमत आपणच ठरवावी हे बरे..!!

काल रात्री एका मित्राच्या ओळखीने एका मुलीने मेसेज केला.. डॉक्टर माझ्या मुलासाठी फिजिओथेरपिस्ट सुचवाल का?

मी लगेच फिजिओथेरपिस्टचा नंबर मेसेज केला.

आज सकाळी त्या मुलीचा फोन, आम्ही मुलाला आधी तुम्हाला दाखवू का?

म्हटल दाखवा..मी रुग्णालयात आहे.

मुलगी, तिचा नवरा, सासू, सासरे १६ महिन्याच्या लहान मुलासोबत आले. नावनोंदणी झाल्यावर सिस्टरांनी वजन करायला घेतले तर नवर्‍याचे म्हणणे दोन दिवसांपूर्वीच केले आहे. आता कशाला.

सिस्टरांनी सांगीतले काट्याकाट्यांमधे फरक असतो त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी या काट्यावर वजन करतो. सर्व मंडळी माझ्या खोलीत यायला निघाली, सिस्टरांनी सांगितले, कोव्हिड साठी काळजी म्हणून एकाच नातेवाईकाने आत जा. तरीही सगळे घुसायला बघत असल्यामुळे मी आई वडिलांनी बसा आणि बाकीच्यांनी प्लीज बाहेर थांबा असे सांगीतले.

तपासणीच्या अंती बाळाच्या रक्ताची तपासणी करुन रक्तक्षय आहे का हे बघावे लागेल असे सांगीतले तर मुलगी म्हणाली इथे होईल का? मी सांगीतले शेजारच्या लॅबमधे जाऊन बघा, त्यांना रक्त काढता आले नाही तर मी काढीन.

नवरा आणि आजोबा शेजारच्या लॅब मधे गेले, आणि बाळ खूप दंगा करत व रडत असल्यामुळे तेथील टेक्निशियन स्वत: बाळाबरोबर माझ्या रुग्णालयात आली व मला म्हणाली, सर मला नाही काढता येणार तुम्ही रक्त काढून देता का?

मी बाळाला आतील खोलीत घ्यायला सांगीतले व बाळाच्या आईला बाहेरच थांबायला सांगीतले, कारण बाळ रडणारच आहे व त्याला धरायला सिस्टर व टेक्निशियन होत्याच, पण या मुलीला चक्कर आली तर तिच्याकडे कोण बघणार?

बाळाला सुई लावून रक्त गोळा करत असतानाच ती मुलगी आत घुसली आणि हे सर्व थांबवा, आम्हाला तपासणी करायचीच नाही असे म्हणू लागली. अर्धे रक्त गोळा होईपर्यंत तिच्या नवर्‍याने बाहेर आरडाओरडा सुरु केला. मी सुई काढली आणि बाळाला त्याच्या आईच्या हवाली केले.

बाळाचे वडिल आणि आजोबा मोठमोठ्या आवाजात माझ्याशी भांडू लागले. ते कशासाठी भांडत होते ते मला अजूनपर्यंत समजलेले नाही. २७ वर्षांच्या प्रॅक्टीसमधे हा अनुभव पहिल्यांदा आला. बालरोगतज्ञ असल्यामुळे लहान मुलाचे रक्त काढायची वेळ दररोज माझ्यावर अनेक वेळा येते. अगदी नवजात बालकापासून ते दंगेखोर दहा वर्षांच्या मुलापर्यंत अनेकांचे रक्त काढण्यासाठी छोट्या रक्तवाहिनीतून रक्त काढण्याचे कसब फार थोड्या व्यक्तींकडे असते जे सुदैवाने माझ्याकडे आहे. त्याचा फायदा त्या बाळाला करुन देण्यासाठी मला एक रुपया सुध्दा मिळत नाही..!! पण त्याची किंमत त्या कुटुंबाला नव्हती. आम्हाला तपासणी करायचीच नाही असा साक्षात्कार त्यांना बाळाला सुई लावल्यानंतर झाला. त्यांचे म्हणणे आमच्या परवानगीशिवाय आमच्या बाळाला रडवून तुम्ही त्याला भोसकले हे काही चांगले केले नाही.

रक्त तिथेच ठेवून ते कुटुंब आलिशान गाडीतून रवाना झाले. काढलेले रक्त मी माझ्या खर्चाने तपासून घेतले. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ९.५ आले.

बाळाच्या काळजीपोटी त्याला सुई भोसकणार्‍या डॉक्टरांना अद्वा तद्वा बोलणारे कुटुंब बाळाच्या संगोपनाची किती काळजी घेते हे उघड झालेच. मी तो रिपोर्ट त्या मुलीच्या नंबर वर पाठवून माझे कर्तव्य केले आहे कारण या सगळ्यात दोष माझा किंवा कुटुंबाचा आहे, लहान मुलाचा नाही...!!!

गेल्या १६ महिन्यात त्यांच्या बालरोग तज्ञाला जे समजले नाही ते मला २७ वर्षांचा अनुभवाने कळले, पण २७ वर्षांचा अनुभव असलेला बालरोगतज्ञ २७ वर्षांच्या मूर्ख आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही हे खरेच दुर्दैव..!!

रक्त काढण्यासाठी बालरोग तज्ञ म्हणून मला वेगळे ५०० रुपये द्यावे लागतील असा उद्यापासून नियम.

आपली किंमत आपणच ठरवावी हे बरे..!!

Tuesday, October 5, 2021

टेलिमेडिसिन साठी संमतीपत्राचे महत्व

टेलिमेडिसिन म्हणजे रुग्णाला डॉक्टरांनी प्रत्यक्ष न तपासता दूर अंतरावरून (दूरध्वनी, व्हॉट्सएप, व्हीडिओ कॉन्फरन्स [दूर-दृक्श्राव्य-परिषद] इत्यांदींचा वापर करुन ) रुग्णाच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे उपचार करणे. यावरुन सहज लक्षात येते ती महत्वाची गोष्ट अशी की रुग्णाला प्रत्यक्ष तपासून जी माहिती कळते ती उपलब्ध नसताना आजाराचे अनुमान बांधून शक्य तितके औषधोपचार देणे तंत्रज्ञानाचा वापर करुन शक्य आहे. 

करोनाच्या महामारीच्या काळात जेंव्हा रुग्णांच्या हालचालीवर निर्बंध होते आणि डॉक्टरांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आवश्यक सामुग्रीचा अभाव होता त्या काळात टेलिमेडिसिनचा वापर करुन अनेक रुग्णांवर उपचार करता आले. इतर वेळी जेंव्हा रुग्णाला डॉक्टरांपर्यंत अथवा डॉक्टरांना रुग्णापर्यंत पोचणे शक्य नसेल तेंव्हा टेलिमेडिसिनची उपयुक्तता निश्चितच आहे. 

२००६ साली मी बंगलोरच्या आय. आय. एस. सी. मधे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेलिमेडिसिन परिषदेत "मल्टिलिंग्वल इंटरफेस फॉर टेलिमेडिसिन एप्लिकेशन्स" हा शोधनिबंध वाचला होता. त्यावेळी सभागृहात  बसलेल्या हृदयरोग तज्ञाने लडाख येथील रुग्णाच्या हृदयाची तपासणी करुन दाखवली. त्यासाठी लडाख येथील १२वी पास विद्यार्थ्याने तेथील कलर डॉपलर (सोनोग्राफी) मशीनचा प्रोब रुग्णाच्या छातीवर ठेवला आणि बंगलोरमधील तज्ञाच्या सूचनेनुसार तो डावी, उजवी, वर, खाली हलवून सोनोग्राफी चित्र आमच्या समोरील पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.  अंदमान निकोबार येथील रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी सभागृहातील नेत्ररोगतज्ञाने  केली. मोतिबिंदू चे ऑपरेशन करायची गरज असेल तर मात्र रुग्णाला मद्रासला यावे लागेल असे सांगावे लागले कारण शस्त्रक्रिया करणे सध्या तरी अशक्य आहे. कोणी सांगावे काही दिवसांनी "रोबो" च्या सहाय्याने शस्त्रक्रिया सुध्दा करता येइल.

तंत्रज्ञानाची भरारी एव्हडी मोठी असताना खूप डॉक्टर खूप रुग्णांसाठी टेलिमिडिसिन का वापरत नाहीत असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण असे की तंत्रज्ञानातील तृटींमुळे रुग्णाला होणारे संभाव्य धोके. त्याशिवाय २००९ साली सुप्रीम कोर्टाच्या मार्कंड काट्जू आणि आर. एम. लोढा यांच्या खंडपीठाने मार्टिन डिसूझा विरुध्द मोहम्मद अश्फाक या खटल्याच्या निकालात मुद्दा क्रमांक ५४ मधे असे सांगीतले आहे की रुग्णाला प्रत्यक्ष तपासल्याशिवाय सर्वसामान्यपणे औषधोपचाराचे प्रिस्क्रिप्शन देऊ नये. आणिबाणीच्या परिस्थितीशिवाय दूरध्वनीचा वापर करुन रुग्णोपचार करण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. त्यानंतर आलेल्या काही खटल्यांच्या निकालात सुध्दा रुग्ण प्रत्यक्ष न तपासता केलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांना दंड करण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी नंतर काही दिवसांनी कायद्याचा त्रास स्वत:ला करुन घ्यायचा का असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.

करोना महामारीच्या सुरुवातीला मार्च २०२० मधे भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने "टेलिमेडिसिन प्रॅक्टीस गाईडलाईन्स" म्हणजेच टेलिमेडिसिन च्या वापरासंबंधी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यामधे जर रुग्णाने डॉक्टरांना टेलिमेडिसिनचा वापर करुन उपचार देण्याची विनंती केली अश्या उपचारांसाठी रुग्णाची संमती सूचित केली जाईल असे म्हटले आहे. परंतू एक तर या मार्गदर्शक सूचना आहेत, कायदा नव्हे.  दुसरे म्हणजे रुग्णाला यातील तांत्रिक बाजूचे ज्ञान असण्याची शक्यता कमी आहे. जर रुग्णाने न्यायालयात खटला लावला तर डॉक्टरच्या बाजूने आरोग्य विभाग उभा राहील का हा मोठा प्रश्न आहे. शिवाय रुग्णाच्या उपचारात काही तृटी राहिल्यास ह्या मार्गदर्शक सूचनासुद्धा जबाबदारी डॉक्टरवरच टाकतात. शंका असेल तर उपचार करुन नयेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. 

रुग्ण दवाखान्यात आला की संमती गृहीत धरली जाते आणि प्रत्यक्ष रुग्ण तपासताना शंका असेल तरी प्राथमिक उपचार करुन काही तपासण्या करायला सांगितल्या जातात. त्यामुळे टेलिमेडिसिन द्वारा रुग्णासंबंधी माहिती घेताना काही तृटी राहिल्यास अथवा काही तांत्रिक कारणांमुळे  डॉक्टर व रुग्णातील संवादात अडचणी आल्यास शेवटी डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाणार म्हणून डॉक्टर अश्या प्रकारे उपचार करण्यास फारसे उत्सुक नाहीत. किंबहुना आय. एम. ए. ने सांगीतले की रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे की नाही एव्हडे ठरवण्यासाठी, आणि आधी तपासलेल्या रुग्णाची औषधे चालू ठेवण्यापुरताच टेलिमेडीसिनचा वापर डॉक्टरांनी करावा.


अश्या परिस्थितीत तृटी का राहू शकतात आणि कोणत्या तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर व रुग्णांमधील संवादात अडचणी  निर्माण होऊ शकतात याची माहिती रुग्णांना व डॉक्टरांना झाली, व या कारणांसाठी रुग्ण डॉक्टरांना जबाबदार धरणार नाहीत असे संमतीपत्र रुग्णांनी डॉक्टरांना दिले तर टेलिमेडिसिनचा वापर दैनंदिन जीवनात करता येईल. आपला डॉक्टरांकडे जाण्यायेण्याचा त्रास, बरोबर येणार्‍या नातेवाईकांचा वेळ, गाडी भाडे अथवा पेट्रोलचा खर्च हे सर्व वाचेल. शिवाय रुणालयातील गर्दीमुळे होणार्या संसर्गाची शक्यता कमी होईल. एक रुग्ण बाहेर जाणे व दुसरा आत येणे यातला वाया जाणारा डॉक्टरांचा वेळ वाचेल. ज्या रुग्णांना तपासायलाच पाहिजे त्यांना जास्त वेळ देता येईल, असे अनेक फायदे होऊ शकणार्‍या  टेलिमेडिसिन साठी संमतीपत्रक देणे आणि घेणे महत्वाचे आहे म्हणून हा लेखन प्रपंच..! सोबत संमतीपत्र कसे असावे याचा मसुदा दिला आहे. तो वाचल्यावर बहुतेक वरील  बाबी जास्त स्पष्ट होतील. त्यासंबंधी शंका कृपया विचाराव्यात म्हणजे त्यांची उत्तरे देता येतील, आणि टेलिमेडिसिनचा वापर वाढण्यास मदत होईल. 


टेलिमिडिसिन साठी संमतीपत्राचे महत्व : फेसबुक लाईव्ह रेकॉर्डिंग आपण येथे बघू शकता.
सहभाग : डॉ राजीव जोशी, डॉ शुभांकर नांदखेडकर, डॉ. जुन्नरकर
YouTube link:
https://www.youtube.com/watch?v=ndGztC7Ebwg

डॉ. राजीव जोशी

एम . बी. बी. एस. , एम.  डी. , एल. एल. बी.


Monday, October 4, 2021

राईड



आजकाल लहान मुलांना रडवू नका, हवं ते द्या असा ट्रेंड आहे कारण आई वडिलांकडे पैसा आहे आणि मुलांसाठी वेळ नाही. त्यामुळे मुलांना "नाही" हा शब्दच माहीत नाही.

मी पालकांना सांगतो, ५०० रुपयांची वस्तू गरज असेल तर द्या पण ५ रुपयांची वस्तू गरज नसेल तर " मिळणार नाही" हे सांगा आणि आजी आजोबा आई बाप यांनी एकमताने मुलाला "नाही" याचा अर्थ शिकवा.
१० वीतली एक मुलगी स्कूटी हवी म्हणून हट्ट करत होती. आई वडिल सांगत होते की १० वी पास झाल्यावर देऊ. हिने आत्महत्या करण्यची धमकी दिली.
आई माझ्याकडे येऊन म्हणते
"तुमच्या रुग्णालयात जन्माला आलेली ही मुलगी अशी कशी वागते बघा?"
ती मुलगी १५ वर्षे माझ्याकडे उपचार घेत होती म्हणून मी तिला बोलावून घेतले, आणि विचारले की आई परीक्षेनंतर देईन म्हणत्येय ना?
ती म्हणाली नाही दिली तर?
ठीक आहे, मग मी देईन..माझ्यावर तरी विश्वास आहे ना?
नाही मला आईनेच दिली पाहिजे.
अग, पण आत्महत्या कशाला करायची?
माझ्या मैत्रीणींकडे आहे आणि माझ्याकडे नाही...
मग मी विचारले कशी आत्महत्या करणार?
कांपोझ च्या १० गोळ्या खाऊन.
किती रुपयांना मिळतात?
२० रुपयांना.
मी तिला ५० रुपये काढून दिले आणि म्हणालो २५ गोळ्या आण.
कशाला?
१० तुला आणि १५ तुझ्या आईला.
तिला कशाला?
तू आत्महत्या केल्यावर आई काय करेल असे तुला वाटते?
अहो काका असे का म्हणताय?
अग. दोघींने इथेच गोळ्या खा म्हणजे माझा घरी येऊन डेथ सर्टिफिकेट द्यायचा त्रास वाचेल.
नको हो काका.
सिस्टर तुम्हीच जाऊन २५ गोळ्या आणा
काका, नको हो
सिस्टर जा तुम्ही.. हे घ्या ५० रुपये.
अहो काका मी खरच आत्महत्या करीन असे तुम्हाला वाटले का?
अग अत्ताच म्हणालीसना..
नाही हो, मी आईला घाबरवायला म्हणाले ..
मग आता गपचुप पणे घरी जा, मी पोलिसांना फोन करुन ठेवणार आहे की या मुलीने माझ्या समोर अशी अशी धमकी दिली. परत तू असे काही बोललीस तर आई पोलिसांना कळवेल.
..
न पेक्षा दहावी पास झालीस की माझ्याकडे ये, मी तुला स्कूटीसाठी पैसे देतो.
..

..
..
दहावी पास झाल्यानंतर ती मुलगी स्कूटीवर पेढे द्यायला आली आणि तिने मला स्कूटीवर राईड घ्यायला लावली..!!





Thursday, September 30, 2021

म. ए. सो च्या भावे प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

म. ए. सो च्या भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्यमोहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या माजी विद्यार्थी मेळाव्यांपैकी प्रथम मेळावा १९६० ते १९७५ मधे इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांसाठी दि २६/०९/२०२१ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळात शाळेच्या आवारात पार पडला. मुख्याध्यापक श्री खिलारे आणि सौ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या सर्व अध्यापिका, अध्यापक आणि सेवकवर्ग यांनी खूप परिश्रमपूर्वक समारंभाचे आयोजन केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. अत्यंत कल्पकपणे कार्यक्रमाची चार भागांमधे विभागणी करुन त्या प्र्त्येक भागाचे नियोजन कौशल्याने केल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन.

सर्वप्रथम नाव नोंदणी करतानाच आपण कोव्हिडच्या वातावरणात आहोत याची जाणीव करून देण्यासाठी सॅनिटायझरचे तीर्थ हातावर देऊन त्यानंतर कागदाच्या वेष्टनात गुंडाळलेला पेढा चमच्याने देऊन स्वागत करण्यात आले. नावनोंदणी झाल्यावर जवळच केलेल्या सेल्फी पॉइंटवर एकत्र येऊन एकएका वर्गातील विद्यार्थी ग्रुप फोटो काढण्यात मश्गुल झाले, त्यावेळापुरते काढण्यात आलेले मास्क बाकी सर्व कार्यक्रम भर लावलेले होते..!  सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांचा सह्या घेण्याची कल्पना सुरेख..!!

शाळा भरल्याची घंटा झाल्यावर सर्व विद्यार्थी आपापल्या चौथी उत्तीर्ण वर्षाप्रमाणे रांगांमध्ये उभे राहिले. बाईंनी   सांगीतले एक हात से नाप लो.. आणि शाळा सुरु झाली..!! राष्ट्रगीत,  प्रतिज्ञा,  प्रार्थना झाल्यावर सर्वांना जमिनीवर बसायला सांगितले. येथे वेगळेपण एव्हडेच होतेक की ज्यांना खाली बसणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी बाजूला खुर्च्या ठेवल्या होत्या.  विचारपूर्वक  नियोजनाच्या अनेक उदाहरणांपैकी हे एक.   

आजचा दिनविशेष होता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..!! प्राणायामानंतर  मुख्याध्यापकांनी आई वडिलांचे स्मरण करायला सांगीतले आणि आकाशातून अमृत वर्षाव (पाऊस) सुरु झाला. लगेच सर्व विद्यार्थांना सभागृहात जायला सांगून सर्व अध्यापक/ सेवक वर्ग त्वरेने तेथील व्यवस्था करण्यात कार्यरत झाला. ५ मिनिटांमधे सर्व विद्यार्थी स्थानापन्न झाले व कार्यक्रम पुढे सुरु झाला. अडचणींवर मात करणे आणि पुढे वाटचाल करणे हे शाळेने पुन्हा एकदा शिकवले..!!

सौ महाजन बाईंनी सर्व विद्यार्थांना त्यांच्यामागोमाग शाळेच्या  घोषणा द्यायला लावल्या आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

१,   २,   ३,  ४, भावेची मुले हुशार.. 

५,  ६,   ७,  ८, भावेची कॉलर ताठ

९, १०, ११, १२  भावेचा आहे दरारा....  

या  आरोळ्यांनी सभागृह दुमदुमले..!!

शाळेच्या गेल्या १२५  वर्षांच्या  इतिहासाची चित्रफीत भन्नाट झाली आहे. आपल्या शिक्षकांचे फोटो आणि नावे पाहून मन भरुन आले. उपस्थित राहिलेल्या वृध्द शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी केलेले "एक साथ नमस्ते" सर्वांना ५० वर्षांपूर्वीच्या शाळेत घेऊन गेले...!!

मुख्याध्यापकांनी शाळेच्या पुढील योजनांची माहिती दिली. शाळेची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

त्या नंतर दाभणात सुतळी ओवणे आणि म्हणी ओळखण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. २० मिनिटांमधे दोन खेळांचे आयोजन करुन सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यासाबरोबरच इतर कौशल्ये कशी विकसित केली जातात याची आठवण करुन दिल्याबद्दल  वेदपाठक सरांचे   मनापासून धन्यवाद..!!

त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणी सांगायचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात काहींनी पाल्हाळ लावला तर वेळे अभावी काहींनी आठवणी न सांगताच आटोपले त्यामुळे हा कार्यक्रम अजून चांगला करता आला असता एव्हडेच सांगेन. अर्थात यात संयोजकांचा दोष नसून सहभागी विद्यार्थी काळ काम वेगाची गणिते नीट शिकले नाहीत एव्हडेच म्हणावे लागेल. शाळेतील आजी विद्यार्थ्यांनी तयार केलीली भेटकार्डे माजी विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.

त्या नंतर झालेल्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या भाषणांचा वेळ कमी करून  विद्यार्थ्यांच्या आठवणींसाठी वेळ वाढवायला हवा.  पदाधिकार्‍यांच्या कामाबद्दल  एक पुस्तिका काढून ती सर्वांना दिल्यास जास्त योग्य होईल.  आलेल्या विद्यार्थ्यांपैकी   समाजोपयोगी कामे करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, त्यांच्या यशाबद्दल सर्वांना माहिती देणे जास्त महत्वाचे आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केल्यास  शाळेसाठी देणगी मिळवण्याचा कार्यक्रमाचा उद्देशही सफल होईल असे मला वाटते.

अर्थात हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे काही तृटी राहणे स्वाभाविकच आहे. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. तरीही विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी अजून वेळ दिल्यास जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शाळेला पोचता येईल. पंधरा वर्षांऐवजी ७ ते ८ वर्षांचे विद्यार्थी एका वेळी बोलवावेत. झूम, टीम्स इत्यादींचा वापर करुन परगावी / परदेशी रहात असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेता येईल.  गुगल फॉर्मवर नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नाव नोंदणी करायची गरज नाही. ज्यांनी आपली माहिती गुगल फॉर्मवर भरली नाही  त्यांना लिंक पाठवावी म्हणजे  शाळेकडे सर्व माहिती एक्सेल शीट मधे उपलब्ध होईल.  पुढील मेळाव्यापूर्वी वर्तमान पत्रांमधे बातमी येण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती. 

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित केलेल्या चहापानादरम्यान मित्रमंडळींशी केलेल्या चर्चेत पुढे आलेले मुद्दे वर दिलेले आहेत.  करोना काळातही सुंदर नियोजन करुन यशस्वी मेळावा भरवल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!

डॉ राजीव जोशी