टेलिमेडिसिन म्हणजे रुग्णाला डॉक्टरांनी प्रत्यक्ष न तपासता दूर अंतरावरून (दूरध्वनी, व्हॉट्सएप, व्हीडिओ कॉन्फरन्स [दूर-दृक्श्राव्य-परिषद] इत्यांदींचा वापर करुन ) रुग्णाच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे उपचार करणे. यावरुन सहज लक्षात येते ती महत्वाची गोष्ट अशी की रुग्णाला प्रत्यक्ष तपासून जी माहिती कळते ती उपलब्ध नसताना आजाराचे अनुमान बांधून शक्य तितके औषधोपचार देणे तंत्रज्ञानाचा वापर करुन शक्य आहे.
करोनाच्या महामारीच्या काळात जेंव्हा रुग्णांच्या हालचालीवर निर्बंध होते आणि डॉक्टरांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आवश्यक सामुग्रीचा अभाव होता त्या काळात टेलिमेडिसिनचा वापर करुन अनेक रुग्णांवर उपचार करता आले. इतर वेळी जेंव्हा रुग्णाला डॉक्टरांपर्यंत अथवा डॉक्टरांना रुग्णापर्यंत पोचणे शक्य नसेल तेंव्हा टेलिमेडिसिनची उपयुक्तता निश्चितच आहे.
२००६ साली मी बंगलोरच्या आय. आय. एस. सी. मधे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेलिमेडिसिन परिषदेत "मल्टिलिंग्वल इंटरफेस फॉर टेलिमेडिसिन एप्लिकेशन्स" हा शोधनिबंध वाचला होता. त्यावेळी सभागृहात बसलेल्या हृदयरोग तज्ञाने लडाख येथील रुग्णाच्या हृदयाची तपासणी करुन दाखवली. त्यासाठी लडाख येथील १२वी पास विद्यार्थ्याने तेथील कलर डॉपलर (सोनोग्राफी) मशीनचा प्रोब रुग्णाच्या छातीवर ठेवला आणि बंगलोरमधील तज्ञाच्या सूचनेनुसार तो डावी, उजवी, वर, खाली हलवून सोनोग्राफी चित्र आमच्या समोरील पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले. अंदमान निकोबार येथील रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी सभागृहातील नेत्ररोगतज्ञाने केली. मोतिबिंदू चे ऑपरेशन करायची गरज असेल तर मात्र रुग्णाला मद्रासला यावे लागेल असे सांगावे लागले कारण शस्त्रक्रिया करणे सध्या तरी अशक्य आहे. कोणी सांगावे काही दिवसांनी "रोबो" च्या सहाय्याने शस्त्रक्रिया सुध्दा करता येइल.
तंत्रज्ञानाची भरारी एव्हडी मोठी असताना खूप डॉक्टर खूप रुग्णांसाठी टेलिमिडिसिन का वापरत नाहीत असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण असे की तंत्रज्ञानातील तृटींमुळे रुग्णाला होणारे संभाव्य धोके. त्याशिवाय २००९ साली सुप्रीम कोर्टाच्या मार्कंड काट्जू आणि आर. एम. लोढा यांच्या खंडपीठाने मार्टिन डिसूझा विरुध्द मोहम्मद अश्फाक या खटल्याच्या निकालात मुद्दा क्रमांक ५४ मधे असे सांगीतले आहे की रुग्णाला प्रत्यक्ष तपासल्याशिवाय सर्वसामान्यपणे औषधोपचाराचे प्रिस्क्रिप्शन देऊ नये. आणिबाणीच्या परिस्थितीशिवाय दूरध्वनीचा वापर करुन रुग्णोपचार करण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. त्यानंतर आलेल्या काही खटल्यांच्या निकालात सुध्दा रुग्ण प्रत्यक्ष न तपासता केलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांना दंड करण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी नंतर काही दिवसांनी कायद्याचा त्रास स्वत:ला करुन घ्यायचा का असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.
करोना महामारीच्या सुरुवातीला मार्च २०२० मधे भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने "टेलिमेडिसिन प्रॅक्टीस गाईडलाईन्स" म्हणजेच टेलिमेडिसिन च्या वापरासंबंधी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यामधे जर रुग्णाने डॉक्टरांना टेलिमेडिसिनचा वापर करुन उपचार देण्याची विनंती केली अश्या उपचारांसाठी रुग्णाची संमती सूचित केली जाईल असे म्हटले आहे. परंतू एक तर या मार्गदर्शक सूचना आहेत, कायदा नव्हे. दुसरे म्हणजे रुग्णाला यातील तांत्रिक बाजूचे ज्ञान असण्याची शक्यता कमी आहे. जर रुग्णाने न्यायालयात खटला लावला तर डॉक्टरच्या बाजूने आरोग्य विभाग उभा राहील का हा मोठा प्रश्न आहे. शिवाय रुग्णाच्या उपचारात काही तृटी राहिल्यास ह्या मार्गदर्शक सूचनासुद्धा जबाबदारी डॉक्टरवरच टाकतात. शंका असेल तर उपचार करुन नयेत असे स्पष्टपणे म्हटले आहे.
रुग्ण दवाखान्यात आला की संमती गृहीत धरली जाते आणि प्रत्यक्ष रुग्ण तपासताना शंका असेल तरी प्राथमिक उपचार करुन काही तपासण्या करायला सांगितल्या जातात. त्यामुळे टेलिमेडिसिन द्वारा रुग्णासंबंधी माहिती घेताना काही तृटी राहिल्यास अथवा काही तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर व रुग्णातील संवादात अडचणी आल्यास शेवटी डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाणार म्हणून डॉक्टर अश्या प्रकारे उपचार करण्यास फारसे उत्सुक नाहीत. किंबहुना आय. एम. ए. ने सांगीतले की रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे की नाही एव्हडे ठरवण्यासाठी, आणि आधी तपासलेल्या रुग्णाची औषधे चालू ठेवण्यापुरताच टेलिमेडीसिनचा वापर डॉक्टरांनी करावा.
अश्या परिस्थितीत तृटी का राहू शकतात आणि कोणत्या तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर व रुग्णांमधील संवादात अडचणी निर्माण होऊ शकतात याची माहिती रुग्णांना व डॉक्टरांना झाली, व या कारणांसाठी रुग्ण डॉक्टरांना जबाबदार धरणार नाहीत असे संमतीपत्र रुग्णांनी डॉक्टरांना दिले तर टेलिमेडिसिनचा वापर दैनंदिन जीवनात करता येईल. आपला डॉक्टरांकडे जाण्यायेण्याचा त्रास, बरोबर येणार्या नातेवाईकांचा वेळ, गाडी भाडे अथवा पेट्रोलचा खर्च हे सर्व वाचेल. शिवाय रुणालयातील गर्दीमुळे होणार्या संसर्गाची शक्यता कमी होईल. एक रुग्ण बाहेर जाणे व दुसरा आत येणे यातला वाया जाणारा डॉक्टरांचा वेळ वाचेल. ज्या रुग्णांना तपासायलाच पाहिजे त्यांना जास्त वेळ देता येईल, असे अनेक फायदे होऊ शकणार्या टेलिमेडिसिन साठी संमतीपत्रक देणे आणि घेणे महत्वाचे आहे म्हणून हा लेखन प्रपंच..! सोबत संमतीपत्र कसे असावे याचा मसुदा दिला आहे. तो वाचल्यावर बहुतेक वरील बाबी जास्त स्पष्ट होतील. त्यासंबंधी शंका कृपया विचाराव्यात म्हणजे त्यांची उत्तरे देता येतील, आणि टेलिमेडिसिनचा वापर वाढण्यास मदत होईल.
डॉ. राजीव जोशी
एम . बी. बी. एस. , एम. डी. , एल. एल. बी.
No comments:
Post a Comment