आम्ही रेणुकास्वरुप शाळेशेजारीच दत्तकुटीत रहात होतो. या शाळेत दरवर्षी सवाई गंधर्व मोहोत्सव साजरा होत असे. तीन रात्री हा संगीताचा कार्यक्रम होई आणि शेवटच्या दिवशी पहाटे पहाटे भीमसेन जोशी यांच्या गायनाने त्याची सांगता होत असे. या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळणे ही संगीतात खूप तपस्या करण्याची पावतीच समजली जात असे. गाणे ऐकण्यासाठी मात्र संगीतातील दर्दी व्यक्तींपासून ते आपल्याला गाणे किती समजते हे दाखवण्यासाठी शाल घेऊन मिरवणार्यांपर्यंत सर्व प्रकारच्या व्यक्ती हजेरी लावत. आम्ही शेजारी रहात असूनही संगीतचा थोडासुध्दा गंध नव्हता. पण त्या आवारात असलेल्या बटाटेवड्यांच्या स्टॉलवरुन भजी आणण्यासाठी मात्र आम्ही हजेरी लावत असू..!!
त्यावेळी आमच्या वाड्यात सुध्दा कोणाकोणाचा चहा कॉफीचा स्टॉल असे. मी आठवीत, एक भाऊ सहावीत आणि दुसरा भाऊ पाचवीत असताना आमची व सवंगड्यांची चर्चा झाली की आपण तेथे चहा, कॉफी व बटाटेवड्यांचा स्टॉल का टाकू नये? आई वडिलांना परवानगी विचारली असता ते म्हणाली की आजीला विचारा, कारण ती वाड्याची मालकीण आहे.
मग आम्ही आजीकडे गेलो. ती म्हणाली की जे कोणी असे स्टॉल लावतात ते तिला ३०० रुपये भाडे देतात, तेव्ह्डे तुम्ही द्या, म्हणजे मी तुम्हाला परवानगी देईन. आम्ही म्हणालो आम्ही कुठून पैसे देणार? त्यावर ती म्हणाली की व्यवहार चोख असायला हवा. पैसा नाते जोडतो आणि पैसाच नाते तोडतो. त्यामुळे तुम्ही मला पैसे दिलेत की माझी काही हरकत नाही, नाहीतर मी दुसर्यांना जागा देईन. आमचे सवंगडी तर फारच नाराज झाले.
मग आम्ही वडिलांना विचारले की सख्खी आजी भाडे मागते म्हणजे काय? ते म्हणाले की हा व्यवहार आहे. मी तुम्हाला ३०० रुपये देतो, आणि तुम्हाला स्टॉल चालवून नफा झाला की तुम्ही मला पैसे परत द्या. आम्ही म्हणालो ठीक आहे. मित्रांना हे काही फारसे पटले नाही पण त्यातील चौघांनी आपापल्या घरी हे सर्व सांगून १०० रुपये प्रत्येकी आणले आणि आणि आमचे तिघांचे प्रत्येकी १०० रुपये जोडून खरेदी साठीचे भांडवल उभे राहिले.
त्यातून आम्ही जोंधळ्यापासून लाह्या करुन घेतल्या व त्याची प्लॅस्टिकची पाकिटे तयार केली. आगाउ रक्कम भरुन १० लिटर दुधाची तजवीज केली, भाडे देऊन २५ कपांचे दोन थर्मास, कप बश्या व टेबले मिळण्याची व्यवस्था केली. साखर, कांदे, बटाटे व मसाल्याचे पदार्थ, तेल, डाळीचे पीठ इत्यांदींची खरेदी केली. वडे तळण्यासाठी मोठी कढई, झारे व गॅसची शेगडी घेऊन येईल असा आचारी शोधला व त्याच्याशी व्यवहार ठरवला. या सर्वांमधे आई वडिलांचे मार्गदर्शन होतेच. पण सर्व काम आम्ही मित्र मित्र करत होतो. चॉकलेट, गोळ्या, आणि सिगारेटी सुध्दा ठेवायचे ठरले कारण शाल घेऊन मिरवणारे धूर सोडत बोलताना आम्ही बघितले होते..!!
ज्या दिवशी सवाई गंधर्वाच्या मोहोत्सवाची सुरुवात होणार होती त्या दिवशी सकाळी लवकर उठून बटाटे उकडले आणि त्याची साले काढून ठेवली कारण त्यानंतर शाळा होती. शाळेतून परत आल्यावर बटाटे कुस्करुन त्यामधे परतलेला कांदा घालून बटाटेवड्यांचे सारण तयार झाले. कांदा चिरुन कांदा भज्यांची तयारी झाली. संध्याकाळी टेबले लावून त्यावर कप बश्या मांडल्या. आचार्याने भट्टी लावली व पहिला चहा तयार झाला. थर्मास भरुन टेबलवर आला व बटाटेवड्यांचा पहिला घाणा कढईत गेला.
चहा, कॉफी, बटाटेवडे भजी अश्या आरोळ्या आम्ही द्यायला लागलो आणि एके एक करुन गिर्हाईक यायला लागले.!! लोक चहा गार लागतो म्हणू लागले. मग आईने युक्ती सुचवली की कप बशी विसळून झाले की गरम पाण्यात बुडवून ठेवा. ही मात्रा लागू पडली.. गरम चहा साठी गर्दी वाढली. !!
चहा बरोबर सिगारेट आहे का अशी चौकशी सुरु झाली आणि बघता बघता आमच्या कडील सिगारेट संपल्या. मग मी सायकल घेऊन जवळील पानवाल्याकडे गेलो तर पठ्याने पाकिटाचा भाव वाढवला होता. थोडे दूर गेल्यावर मात्र नेहमीच्या भावात सिगारेटची ५ पाकीटे मिळाली. परत आल्यावर सगळ्यांना हे सांगीतले तेंव्हा आपणही सिगारेटचा भाव वाढवूया असे ठरले. २५ पैशांची सिगारेट लोक ५० पैशांना विकत घेत होते कारण इतर कोणाकडेही सिगारेट नव्हती.!
रात्री बारा पर्यंत आमच्याकडील दूध, साखर, बटाटेवडे, कांदाभजी आणि सिगारेटी सर्व संपल्या होत्या..!! आमच्या गल्यात १००० पेक्षा जास्त रुपये साठले होते. दुसर्या दिवशी पहाटे उठून मंडईत गेलो. दुप्पट बटाटे, कांदे, इत्यादी पदार्थ आणि २० लिटर दूध आणि सिगारेटची पंचवीस पाकिटे खरेदी केली. बटाटे उकडून झोपलो कारण रात्री जागरण झाले होते. उठल्यावर बटाटे सोलणे, कांदे कापणे, परतणे असा कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी परत स्टॉल लागला. रात्री दोन पर्यंत सर्व पदार्थ संपले. सिगारेटाची किंमत रात्री दहा पर्यंत २५ पैसे, १२ पर्यंत ५० पैसे आणि शेवटपर्यंत ७५ पैसे ठेवली. दोन पाकिटे शिल्लक राहिली. गल्यात होते २००० पेक्षा जास्त रुपये..!!
तिसर्या दिवशी आत्मविश्वास वाढला होता. अजून जास्त सामान खरेदी केले. त्या रात्री आम्ही २००० कप चहा, ५०० कप कॉफी, ३० पाकिटे सिगारेट, आणि भजी व बटाटेवडे पहाटे ४ वाजेपर्यंत विकत होतो. शेवटची ५ सिगारेटची पाकिटे १ रुपयाला एक सिगारेट या भावाने विकली. सर्व आवराआवरी करेपर्यंत पहाटेचे पाच वाजले आणि भीमसेन जोशी गायला बसले..!! त्या दिवशी पहिल्यांदा भीमसेन जोशींचे अभंग ऐकले, तारवटलेल्या डोळ्यांनी ..!!
सकाळी आचार्याला त्याचा मोबदला दिला, वडिलांना त्यांचे पैसे परत दिले आणि मिळालेले पैसे ७ जणांमधे विभागून घेतले. तीन दिवसांच्या कष्टांनंतर प्रत्येकी ५०० रुपये नफा झाला होता. कष्टांचे मोल मिळाले पण जे व्यवहार ज्ञान मिळाले ते आयुष्यभर उपयोगी पडले.
मी एम. बी. बी. एस. च्या प्रथम वर्षाला असताना वडिलांचे एक डॉक्टर मित्र सवाई गंधर्व मोहोत्सवाला आले होते. ते रात्री चहा साठी आमच्या स्टॉल वर आले. मला पाहून म्हणाले "तू काय करतोस इथे"? मी म्हणालो, काका, आम्ही गेली पाच वर्ष हा स्टॉल चालवतोय. त्यांनी सकाळी सकाळी वडिलांना फोन केला. ते म्हणाले, "अरे तुझा मुलगा डॉक्टर होणार आहे. त्याला चहा कॉफी विकायची परवानगी कशी देतोस? लोक काय म्हणतील?" झाले. पुढच्या वर्षीपासून आम्हाला स्टॉल बंद करायला लागला...
भीमसेन जोशींचे ते अभंग आजही कानावर पडले की आठवतो लहानपणी पुरी ५ वर्षे चालवलेला चहा, कॉफी, बटाटेवडे, कांदाभजी आणि सिगारेट स्टॉल..!! आणि आठवतो तो रात्रीत सात आठ कप चहा पिणारा, आमच्यावर चिडत चिडत वाढत्या दराने सिगारेट खरेदी करणारा, भगवा झब्बा आणि फेडेड जीन असा वेश परिधान करून खांद्यावर शबनम घेऊन गाण्याचा मनमुराद आनंद लुटणारा; रसिकाच्या रुपात व्यवहारज्ञान, विपणन, अर्थशास्त्र आणि बरेच काही शिकवत आमच्या कष्टांना दाद देणारा चोखंदळ ग्राहक.!!
डॉ. राजीव जोशी.

No comments:
Post a Comment