(भाग एक)
१९९४ साली मी व माझ्या पत्नीने पुण्यातील बिबवेवाडीत रुग्णालय सुरु केले. उद्घाटनाचे चे आमंत्रण देण्यासाठी आम्ही बिबवेवाडीतील सर्व डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी एका डॉक्टरांनी मला विचारले, "अरे तुझ्या शेजारी एक एम. बी. बी. एस. बाई बालरोग तज्ञ म्हणून काम करतात आणि त्यांचा सर्जन नवरा गायनॅकॉलॉजिस्ट सारखी ऑपरेशन्स करतो. त्यांच्या शेजारच्या तुझ्या रुग्णालयात तुझा बालरोगतज्ञ म्हणून व तुझ्या पत्नीचा स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ म्हणून टिकाव कसा लागणार? रुग्णालय काढण्यापूर्वी थोडा विचार करायचा ना की आपली स्पर्धा कोणाशी आहे?
मी म्हणालो की माझी स्पर्धा माझे बालरोग शास्त्रातील गुरु डॉ. अजेय जोशी यांच्याशी आहे आणि पत्नीची स्पर्धा पुण्यातील अग्रगण्य स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेधा पाटणकर यांच्याशी आहे व आम्ही दोघांनी त्या दोघांच्या रुग्णालयांतच कामाचा अनुभव घेतला आहे. झाले, पाहता पाहता वावटळीसारखी ही चर्चा गावभर पोचली. डॉ. अजेय जोशी सरांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले की तू असे म्हणालास का? मी म्हणालो हो. उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी येणार्याला भिती दाखवणार्या त्या मूर्ख डॉक्टरांचा असला झटका बसला की त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता..!!
सरांनी माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, आत्ता माझे नाव घेतलेस ते ठीक झाले, पण यापुढे असे प्रसंग येतील तेंव्हा इतरांची नावे न घेता बोलत जा, कारण व्यवसायात कोण मित्र आणि कोण शत्रू हे समजायला खूप दिवस जातात. स्वत:हून कोणाचे शत्रुत्व निर्माण करू नकोस कारण तुमच्या पिढीला जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल असे मला वाटते.
सर उद्घाटनाला आलेच पण त्यांतरही माझ्याकडून बरा न झालेला रुग्ण त्यांच्याकडे गेल्यास रुग्णाला माझ्याकडे परत पाठवले व मला सांभाळून घेत रुग्ण बरा होण्यासाठी योग्य दिशा दाखवली. डॉ. पाटणकरांना उद्घाटनाला यायला जमले नाही परंतू त्यानंतर मुद्दाम येऊन त्यांनी आमचे अभिनंदन केले. आमचे रुग्णालय सुरु झाल्यानंतर वर्षभर माझी पत्नी त्यांच्याकडे काम करत होती कारण सुरुवातीच्या काळात एकाने तरी थोडे पैसे मिळवणे गरजेचे होते.
.... क्रमश:
डॉ राजीव जोशी बालरोगतज्ञ, वैद्यकीय संगणकशास्त्र तज्ञ. विधितज्ञ आणि न्यायवैद्यकीय सल्लागार
No comments:
Post a Comment