डॉ श्रीराम गीत यांनी लिहिलेले आणि समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे उत्कृष्ट पुस्तक अलिकडेच वाचनात आले.
वैद्यकीय उपचारांच्या अतोनात वाढलेल्या ख्रर्चाबद्दल खूप साधक बाधक चर्चा होत असताना आलेल्या या पुस्तकात; वैद्यकीय व्यवसायातील अर्थकारणाबद्दल खूपच संतुलित विवरण दिलेले आहे. खर्चाचा भोवरा कसा तयार होतो, त्यात रुग्ण कसा सापडतो, आणि त्या भोवर्यात सापडू नये म्हणून सामान्य माणसाला काय करता येईल अश्या क्रमाने हे पुस्तक अतिशय सोप्या भाषेत प्रबोधन करते.
बिघडलेल्या वैद्यकीय अर्थकारणाला निरनिराळे घटक कसे हातभार लावतात हे या पुस्तकाच्या पहिल्या भागात सांगून लेखकाने वैद्यकाच्या आर्थिक वास्तवाचे वर्णन केले आहे. डॉक्टर, रुग्णालये, रुग्ण आणि शेवटी बाजारातील शक्ती ह्यापैकी कोणत्याही घटकावर टीका, आरोप न करता लेखकाने अर्थकारणावर हे सर्व घटक कसा परिणाम करतात हे उदाहरणासह दाखवून दिले आहे. "टाळी एका हाताने वाजत नाही" ही म्हण सर्वांनाच माहीत आहे, पण टाळ्या वाजवणारे अनेक हात लेखकाच्या चष्म्यातून आपल्याला दिसतात..!!
साधे आजार, गरजा आणि वास्तव या विभागात डॉ श्रीराम गीत यांनी सर्दी, पित्त, कंबर दुखी, खोकला, लठ्ठपणा अश्या १५ आजार समूहांवर उपचार सुचवलेले नाहीत, पण त्यांचे अर्थकारण कसे बदलत जाते हे वरील चार घटकांच्या अनुषंगाने उलगडून दाखवले आहे. गंभीर आजार, रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अपेक्षा आणि त्यातून सर्वांची होणारी फरफट निरनिराळी उदाहरणे देऊन पुस्तकाच्या एका भागात विस्तृतपणे मांडलेली आहेत. हृदयविकार, मूत्रपिंडांचे आजार, कॅंन्सर इत्यादी आजारांशी लढा देणारे अनेक रुग्ण, आणि अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णांचे निकटचे नातेवाईक यांची मानसिकता या सर्वांचा अतिशय प्रामाणिक आढावा या भागात घेण्यात आला आहे.
शेवटच्या भागात या सर्व परिस्थितीवर काही उपाय सुचवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच इच्छापत्रक तयार करुन आपल्या कुटुंबाला ख्रर्चाच्या भोवर्यातून कसे वाचवता येईल याची माहितीसुध्दा या पुस्तकात दिली आहे. डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना हे पुस्तक वाचायला सुचवावे असे वाटते.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतनिसांसाठी अभ्यासक्रम वाढवणे आणि डॉ. देवी शेट्टी यांनी चालू केलेली स्वस्त विमा योजना सर्व लोकांसाठी उपलब्ध करणे ह्या गोष्टी सर्वसामान्य वाचकांच्या हातात नाहीत. पण डॉ श्रीराम गीतांनी काढलेल्या "प्रश्नपत्रिकेतील" दहा प्रश्नांची उत्तरे वाचकांनी स्वत:पुरती शोधल्यास, आणि त्या प्रश्नांवरील चर्चेत नमूद केलेल्या मुद्यांवर विचार केल्यास वैद्यकीय खर्चाच्या भोवर्यातून सुटका करुन घेण्यास नक्कीच मदत होईल. त्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे..!!
डॉ. श्रीराम गीतांनी काढलेल्या प्रश्नपत्रिकेतील हे प्रश्न खालील प्रमाणे आहेत:
१) आजारी कोण पडणार?
२) पैसे कोण देणार?
३) तपासण्या कोणाच्या करणार?
४) आजाराची संपूर्ण माहिती कळण्याचा हक्क कोणाचा?
५) उपचारांचे विविध पर्याय समजून कोण घेणार?
६) निर्णयामधे सहभागी कोण होणार?
७) नीट माहिती न देणारा डॉक्टर कोण बदलणार?
८) नीट शुश्रुषा न करणारा कोण बदलणार?
९) दोन सारख्याच औषधांची किमत फरक फार असला तरी खरेदी कोण करणार?
१०) औषधे नकोत, उपचार नकोत, जगणेही नको, हे कोण ठरवणार?
डॉ. राजीव जोशी.
1 comment:
thought provoking-
Every strata has facilities available and Govt budget on medicare is mind-blowing...but who is taking the best facilities in a better Govt Hospital. The one who has money spends 2 lac just for an air ambulance and the poor delivers on way to a govt set-up.
Post a Comment