Tuesday, October 19, 2021

सवाई गंधर्व मोहोत्सवातील व्यवसाय


आम्ही रेणुकास्वरुप शाळेशेजारीच दत्तकुटीत रहात होतो. या शाळेत दरवर्षी सवाई गंधर्व मोहोत्सव साजरा होत असे. तीन रात्री हा संगीताचा कार्यक्रम होई आणि शेवटच्या दिवशी पहाटे पहाटे भीमसेन जोशी यांच्या गायनाने त्याची सांगता होत असे. या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळणे ही संगीतात खूप तपस्या करण्याची पावतीच समजली जात असे. गाणे ऐकण्यासाठी मात्र संगीतातील दर्दी व्यक्तींपासून ते आपल्याला गाणे किती समजते हे दाखवण्यासाठी शाल घेऊन मिरवणार्यांपर्यंत सर्व प्रकारच्या व्यक्ती हजेरी लावत. आम्ही शेजारी रहात असूनही संगीतचा थोडासुध्दा गंध नव्हता. पण त्या आवारात असलेल्या बटाटेवड्यांच्या स्टॉलवरुन भजी आणण्यासाठी मात्र आम्ही हजेरी लावत असू..!!

त्यावेळी आमच्या वाड्यात सुध्दा कोणाकोणाचा चहा कॉफीचा स्टॉल असे. मी आठवीत, एक भाऊ सहावीत आणि दुसरा भाऊ पाचवीत असताना आमची व सवंगड्यांची चर्चा झाली की आपण तेथे चहा, कॉफी व बटाटेवड्यांचा स्टॉल का टाकू नये? आई वडिलांना परवानगी विचारली असता ते म्हणाली की आजीला विचारा, कारण ती वाड्याची मालकीण आहे.

मग आम्ही आजीकडे गेलो. ती म्हणाली की जे कोणी असे स्टॉल लावतात ते तिला ३०० रुपये भाडे देतात, तेव्ह्डे तुम्ही द्या, म्हणजे मी तुम्हाला परवानगी देईन. आम्ही म्हणालो आम्ही कुठून पैसे देणार? त्यावर ती म्हणाली की व्यवहार चोख असायला हवा. पैसा नाते जोडतो आणि पैसाच नाते तोडतो. त्यामुळे तुम्ही मला पैसे दिलेत की माझी काही हरकत नाही, नाहीतर मी दुसर्यांना जागा देईन. आमचे सवंगडी तर फारच नाराज झाले.

मग आम्ही वडिलांना विचारले की सख्खी आजी भाडे मागते म्हणजे काय? ते म्हणाले की हा व्यवहार आहे. मी तुम्हाला ३०० रुपये देतो, आणि तुम्हाला स्टॉल चालवून नफा झाला की तुम्ही मला पैसे परत द्या. आम्ही म्हणालो ठीक आहे. मित्रांना हे काही फारसे पटले नाही पण त्यातील चौघांनी आपापल्या घरी हे सर्व सांगून १०० रुपये प्रत्येकी आणले आणि आणि आमचे तिघांचे प्रत्येकी १०० रुपये जोडून खरेदी साठीचे भांडवल उभे राहिले.

त्यातून आम्ही जोंधळ्यापासून लाह्या करुन घेतल्या व त्याची प्लॅस्टिकची पाकिटे तयार केली. आगाउ रक्कम भरुन १० लिटर दुधाची तजवीज केली, भाडे देऊन २५ कपांचे दोन थर्मास, कप बश्या व टेबले मिळण्याची व्यवस्था केली. साखर, कांदे, बटाटे व मसाल्याचे पदार्थ, तेल, डाळीचे पीठ इत्यांदींची खरेदी केली. वडे तळण्यासाठी मोठी कढई, झारे व गॅसची शेगडी घेऊन येईल असा आचारी शोधला व त्याच्याशी व्यवहार ठरवला. या सर्वांमधे आई वडिलांचे मार्गदर्शन होतेच. पण सर्व काम आम्ही मित्र मित्र करत होतो. चॉकलेट, गोळ्या, आणि सिगारेटी सुध्दा ठेवायचे ठरले कारण शाल घेऊन मिरवणारे धूर सोडत बोलताना आम्ही बघितले होते..!!

ज्या दिवशी सवाई गंधर्वाच्या मोहोत्सवाची सुरुवात होणार होती त्या दिवशी सकाळी लवकर उठून बटाटे उकडले आणि त्याची साले काढून ठेवली कारण त्यानंतर शाळा होती. शाळेतून परत आल्यावर बटाटे कुस्करुन त्यामधे परतलेला कांदा घालून बटाटेवड्यांचे सारण तयार झाले. कांदा चिरुन कांदा भज्यांची तयारी झाली. संध्याकाळी टेबले लावून त्यावर कप बश्या मांडल्या. आचार्याने भट्टी लावली व पहिला चहा तयार झाला. थर्मास भरुन टेबलवर आला व बटाटेवड्यांचा पहिला घाणा कढईत गेला.

चहा, कॉफी, बटाटेवडे भजी अश्या आरोळ्या आम्ही द्यायला लागलो आणि एके एक करुन गिर्हाईक यायला लागले.!! लोक चहा गार लागतो म्हणू लागले. मग आईने युक्ती सुचवली की कप बशी विसळून झाले की गरम पाण्यात बुडवून ठेवा. ही मात्रा लागू पडली.. गरम चहा साठी गर्दी वाढली. !!

चहा बरोबर सिगारेट आहे का अशी चौकशी सुरु झाली आणि बघता बघता आमच्या कडील सिगारेट संपल्या. मग मी सायकल घेऊन जवळील पानवाल्याकडे गेलो तर पठ्याने पाकिटाचा भाव वाढवला होता. थोडे दूर गेल्यावर मात्र नेहमीच्या भावात सिगारेटची ५ पाकीटे मिळाली. परत आल्यावर सगळ्यांना हे सांगीतले तेंव्हा आपणही सिगारेटचा भाव वाढवूया असे ठरले. २५ पैशांची सिगारेट लोक ५० पैशांना विकत घेत होते कारण इतर कोणाकडेही सिगारेट नव्हती.!

रात्री बारा पर्यंत आमच्याकडील दूध, साखर, बटाटेवडे, कांदाभजी आणि सिगारेटी सर्व संपल्या होत्या..!! आमच्या गल्यात १००० पेक्षा जास्त रुपये साठले होते. दुसर्या दिवशी पहाटे उठून मंडईत गेलो. दुप्पट बटाटे, कांदे, इत्यादी पदार्थ आणि २० लिटर दूध आणि सिगारेटची पंचवीस पाकिटे खरेदी केली. बटाटे उकडून झोपलो कारण रात्री जागरण झाले होते. उठल्यावर बटाटे सोलणे, कांदे कापणे, परतणे असा कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी परत स्टॉल लागला. रात्री दोन पर्यंत सर्व पदार्थ संपले. सिगारेटाची किंमत रात्री दहा पर्यंत २५ पैसे, १२ पर्यंत ५० पैसे आणि शेवटपर्यंत ७५ पैसे ठेवली. दोन पाकिटे शिल्लक राहिली. गल्यात होते २००० पेक्षा जास्त रुपये..!!

तिसर्या दिवशी आत्मविश्वास वाढला होता. अजून जास्त सामान खरेदी केले. त्या रात्री आम्ही २००० कप चहा, ५०० कप कॉफी, ३० पाकिटे सिगारेट, आणि भजी व बटाटेवडे पहाटे ४ वाजेपर्यंत विकत होतो. शेवटची ५ सिगारेटची पाकिटे १ रुपयाला एक सिगारेट या भावाने विकली. सर्व आवराआवरी करेपर्यंत पहाटेचे पाच वाजले आणि भीमसेन जोशी गायला बसले..!! त्या दिवशी पहिल्यांदा भीमसेन जोशींचे अभंग ऐकले, तारवटलेल्या डोळ्यांनी ..!!

सकाळी आचार्याला त्याचा मोबदला दिला, वडिलांना त्यांचे पैसे परत दिले आणि मिळालेले पैसे ७ जणांमधे विभागून घेतले. तीन दिवसांच्या कष्टांनंतर प्रत्येकी ५०० रुपये नफा झाला होता. कष्टांचे मोल मिळाले पण जे व्यवहार ज्ञान मिळाले ते आयुष्यभर उपयोगी पडले.

मी एम. बी. बी. एस. च्या प्रथम वर्षाला असताना वडिलांचे एक डॉक्टर मित्र सवाई गंधर्व मोहोत्सवाला आले होते. ते रात्री चहा साठी आमच्या स्टॉल वर आले. मला पाहून म्हणाले "तू काय करतोस इथे"? मी म्हणालो, काका, आम्ही गेली पाच वर्ष हा स्टॉल चालवतोय. त्यांनी सकाळी सकाळी वडिलांना फोन केला. ते म्हणाले, "अरे तुझा मुलगा डॉक्टर होणार आहे. त्याला चहा कॉफी विकायची परवानगी कशी देतोस? लोक काय म्हणतील?" झाले. पुढच्या वर्षीपासून आम्हाला स्टॉल बंद करायला लागला...

भीमसेन जोशींचे ते अभंग आजही कानावर पडले की आठवतो लहानपणी पुरी ५ वर्षे चालवलेला चहा, कॉफी, बटाटेवडे, कांदाभजी आणि सिगारेट स्टॉल..!! आणि आठवतो तो रात्रीत सात आठ कप चहा पिणारा, आमच्यावर चिडत चिडत वाढत्या दराने सिगारेट खरेदी करणारा, भगवा झब्बा आणि फेडेड जीन असा वेश परिधान करून खांद्यावर शबनम घेऊन गाण्याचा मनमुराद आनंद लुटणारा; रसिकाच्या रुपात व्यवहारज्ञान, विपणन, अर्थशास्त्र आणि बरेच काही शिकवत आमच्या कष्टांना दाद देणारा चोखंदळ ग्राहक.!!

डॉ. राजीव जोशी.

Wednesday, October 6, 2021

आपली किंमत आपणच ठरवावी हे बरे..!!

काल रात्री एका मित्राच्या ओळखीने एका मुलीने मेसेज केला.. डॉक्टर माझ्या मुलासाठी फिजिओथेरपिस्ट सुचवाल का?

मी लगेच फिजिओथेरपिस्टचा नंबर मेसेज केला.

आज सकाळी त्या मुलीचा फोन, आम्ही मुलाला आधी तुम्हाला दाखवू का?

म्हटल दाखवा..मी रुग्णालयात आहे.

मुलगी, तिचा नवरा, सासू, सासरे १६ महिन्याच्या लहान मुलासोबत आले. नावनोंदणी झाल्यावर सिस्टरांनी वजन करायला घेतले तर नवर्‍याचे म्हणणे दोन दिवसांपूर्वीच केले आहे. आता कशाला.

सिस्टरांनी सांगीतले काट्याकाट्यांमधे फरक असतो त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी या काट्यावर वजन करतो. सर्व मंडळी माझ्या खोलीत यायला निघाली, सिस्टरांनी सांगितले, कोव्हिड साठी काळजी म्हणून एकाच नातेवाईकाने आत जा. तरीही सगळे घुसायला बघत असल्यामुळे मी आई वडिलांनी बसा आणि बाकीच्यांनी प्लीज बाहेर थांबा असे सांगीतले.

तपासणीच्या अंती बाळाच्या रक्ताची तपासणी करुन रक्तक्षय आहे का हे बघावे लागेल असे सांगीतले तर मुलगी म्हणाली इथे होईल का? मी सांगीतले शेजारच्या लॅबमधे जाऊन बघा, त्यांना रक्त काढता आले नाही तर मी काढीन.

नवरा आणि आजोबा शेजारच्या लॅब मधे गेले, आणि बाळ खूप दंगा करत व रडत असल्यामुळे तेथील टेक्निशियन स्वत: बाळाबरोबर माझ्या रुग्णालयात आली व मला म्हणाली, सर मला नाही काढता येणार तुम्ही रक्त काढून देता का?

मी बाळाला आतील खोलीत घ्यायला सांगीतले व बाळाच्या आईला बाहेरच थांबायला सांगीतले, कारण बाळ रडणारच आहे व त्याला धरायला सिस्टर व टेक्निशियन होत्याच, पण या मुलीला चक्कर आली तर तिच्याकडे कोण बघणार?

बाळाला सुई लावून रक्त गोळा करत असतानाच ती मुलगी आत घुसली आणि हे सर्व थांबवा, आम्हाला तपासणी करायचीच नाही असे म्हणू लागली. अर्धे रक्त गोळा होईपर्यंत तिच्या नवर्‍याने बाहेर आरडाओरडा सुरु केला. मी सुई काढली आणि बाळाला त्याच्या आईच्या हवाली केले.

बाळाचे वडिल आणि आजोबा मोठमोठ्या आवाजात माझ्याशी भांडू लागले. ते कशासाठी भांडत होते ते मला अजूनपर्यंत समजलेले नाही. २७ वर्षांच्या प्रॅक्टीसमधे हा अनुभव पहिल्यांदा आला. बालरोगतज्ञ असल्यामुळे लहान मुलाचे रक्त काढायची वेळ दररोज माझ्यावर अनेक वेळा येते. अगदी नवजात बालकापासून ते दंगेखोर दहा वर्षांच्या मुलापर्यंत अनेकांचे रक्त काढण्यासाठी छोट्या रक्तवाहिनीतून रक्त काढण्याचे कसब फार थोड्या व्यक्तींकडे असते जे सुदैवाने माझ्याकडे आहे. त्याचा फायदा त्या बाळाला करुन देण्यासाठी मला एक रुपया सुध्दा मिळत नाही..!! पण त्याची किंमत त्या कुटुंबाला नव्हती. आम्हाला तपासणी करायचीच नाही असा साक्षात्कार त्यांना बाळाला सुई लावल्यानंतर झाला. त्यांचे म्हणणे आमच्या परवानगीशिवाय आमच्या बाळाला रडवून तुम्ही त्याला भोसकले हे काही चांगले केले नाही.

रक्त तिथेच ठेवून ते कुटुंब आलिशान गाडीतून रवाना झाले. काढलेले रक्त मी माझ्या खर्चाने तपासून घेतले. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ९.५ आले.

बाळाच्या काळजीपोटी त्याला सुई भोसकणार्‍या डॉक्टरांना अद्वा तद्वा बोलणारे कुटुंब बाळाच्या संगोपनाची किती काळजी घेते हे उघड झालेच. मी तो रिपोर्ट त्या मुलीच्या नंबर वर पाठवून माझे कर्तव्य केले आहे कारण या सगळ्यात दोष माझा किंवा कुटुंबाचा आहे, लहान मुलाचा नाही...!!!

गेल्या १६ महिन्यात त्यांच्या बालरोग तज्ञाला जे समजले नाही ते मला २७ वर्षांचा अनुभवाने कळले, पण २७ वर्षांचा अनुभव असलेला बालरोगतज्ञ २७ वर्षांच्या मूर्ख आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही हे खरेच दुर्दैव..!!

रक्त काढण्यासाठी बालरोग तज्ञ म्हणून मला वेगळे ५०० रुपये द्यावे लागतील असा उद्यापासून नियम.

आपली किंमत आपणच ठरवावी हे बरे..!!

Tuesday, October 5, 2021

टेलिमेडिसिन साठी संमतीपत्राचे महत्व

टेलिमेडिसिन म्हणजे रुग्णाला डॉक्टरांनी प्रत्यक्ष न तपासता दूर अंतरावरून (दूरध्वनी, व्हॉट्सएप, व्हीडिओ कॉन्फरन्स [दूर-दृक्श्राव्य-परिषद] इत्यांदींचा वापर करुन ) रुग्णाच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे उपचार करणे. यावरुन सहज लक्षात येते ती महत्वाची गोष्ट अशी की रुग्णाला प्रत्यक्ष तपासून जी माहिती कळते ती उपलब्ध नसताना आजाराचे अनुमान बांधून शक्य तितके औषधोपचार देणे तंत्रज्ञानाचा वापर करुन शक्य आहे. 

करोनाच्या महामारीच्या काळात जेंव्हा रुग्णांच्या हालचालीवर निर्बंध होते आणि डॉक्टरांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आवश्यक सामुग्रीचा अभाव होता त्या काळात टेलिमेडिसिनचा वापर करुन अनेक रुग्णांवर उपचार करता आले. इतर वेळी जेंव्हा रुग्णाला डॉक्टरांपर्यंत अथवा डॉक्टरांना रुग्णापर्यंत पोचणे शक्य नसेल तेंव्हा टेलिमेडिसिनची उपयुक्तता निश्चितच आहे. 

२००६ साली मी बंगलोरच्या आय. आय. एस. सी. मधे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेलिमेडिसिन परिषदेत "मल्टिलिंग्वल इंटरफेस फॉर टेलिमेडिसिन एप्लिकेशन्स" हा शोधनिबंध वाचला होता. त्यावेळी सभागृहात  बसलेल्या हृदयरोग तज्ञाने लडाख येथील रुग्णाच्या हृदयाची तपासणी करुन दाखवली. त्यासाठी लडाख येथील १२वी पास विद्यार्थ्याने तेथील कलर डॉपलर (सोनोग्राफी) मशीनचा प्रोब रुग्णाच्या छातीवर ठेवला आणि बंगलोरमधील तज्ञाच्या सूचनेनुसार तो डावी, उजवी, वर, खाली हलवून सोनोग्राफी चित्र आमच्या समोरील पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.  अंदमान निकोबार येथील रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी सभागृहातील नेत्ररोगतज्ञाने  केली. मोतिबिंदू चे ऑपरेशन करायची गरज असेल तर मात्र रुग्णाला मद्रासला यावे लागेल असे सांगावे लागले कारण शस्त्रक्रिया करणे सध्या तरी अशक्य आहे. कोणी सांगावे काही दिवसांनी "रोबो" च्या सहाय्याने शस्त्रक्रिया सुध्दा करता येइल.

तंत्रज्ञानाची भरारी एव्हडी मोठी असताना खूप डॉक्टर खूप रुग्णांसाठी टेलिमिडिसिन का वापरत नाहीत असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण असे की तंत्रज्ञानातील तृटींमुळे रुग्णाला होणारे संभाव्य धोके. त्याशिवाय २००९ साली सुप्रीम कोर्टाच्या मार्कंड काट्जू आणि आर. एम. लोढा यांच्या खंडपीठाने मार्टिन डिसूझा विरुध्द मोहम्मद अश्फाक या खटल्याच्या निकालात मुद्दा क्रमांक ५४ मधे असे सांगीतले आहे की रुग्णाला प्रत्यक्ष तपासल्याशिवाय सर्वसामान्यपणे औषधोपचाराचे प्रिस्क्रिप्शन देऊ नये. आणिबाणीच्या परिस्थितीशिवाय दूरध्वनीचा वापर करुन रुग्णोपचार करण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. त्यानंतर आलेल्या काही खटल्यांच्या निकालात सुध्दा रुग्ण प्रत्यक्ष न तपासता केलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांना दंड करण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी नंतर काही दिवसांनी कायद्याचा त्रास स्वत:ला करुन घ्यायचा का असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.

करोना महामारीच्या सुरुवातीला मार्च २०२० मधे भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने "टेलिमेडिसिन प्रॅक्टीस गाईडलाईन्स" म्हणजेच टेलिमेडिसिन च्या वापरासंबंधी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यामधे जर रुग्णाने डॉक्टरांना टेलिमेडिसिनचा वापर करुन उपचार देण्याची विनंती केली अश्या उपचारांसाठी रुग्णाची संमती सूचित केली जाईल असे म्हटले आहे. परंतू एक तर या मार्गदर्शक सूचना आहेत, कायदा नव्हे.  दुसरे म्हणजे रुग्णाला यातील तांत्रिक बाजूचे ज्ञान असण्याची शक्यता कमी आहे. जर रुग्णाने न्यायालयात खटला लावला तर डॉक्टरच्या बाजूने आरोग्य विभाग उभा राहील का हा मोठा प्रश्न आहे. शिवाय रुग्णाच्या उपचारात काही तृटी राहिल्यास ह्या मार्गदर्शक सूचनासुद्धा जबाबदारी डॉक्टरवरच टाकतात. शंका असेल तर उपचार करुन नयेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. 

रुग्ण दवाखान्यात आला की संमती गृहीत धरली जाते आणि प्रत्यक्ष रुग्ण तपासताना शंका असेल तरी प्राथमिक उपचार करुन काही तपासण्या करायला सांगितल्या जातात. त्यामुळे टेलिमेडिसिन द्वारा रुग्णासंबंधी माहिती घेताना काही तृटी राहिल्यास अथवा काही तांत्रिक कारणांमुळे  डॉक्टर व रुग्णातील संवादात अडचणी आल्यास शेवटी डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाणार म्हणून डॉक्टर अश्या प्रकारे उपचार करण्यास फारसे उत्सुक नाहीत. किंबहुना आय. एम. ए. ने सांगीतले की रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे की नाही एव्हडे ठरवण्यासाठी, आणि आधी तपासलेल्या रुग्णाची औषधे चालू ठेवण्यापुरताच टेलिमेडीसिनचा वापर डॉक्टरांनी करावा.


अश्या परिस्थितीत तृटी का राहू शकतात आणि कोणत्या तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर व रुग्णांमधील संवादात अडचणी  निर्माण होऊ शकतात याची माहिती रुग्णांना व डॉक्टरांना झाली, व या कारणांसाठी रुग्ण डॉक्टरांना जबाबदार धरणार नाहीत असे संमतीपत्र रुग्णांनी डॉक्टरांना दिले तर टेलिमेडिसिनचा वापर दैनंदिन जीवनात करता येईल. आपला डॉक्टरांकडे जाण्यायेण्याचा त्रास, बरोबर येणार्‍या नातेवाईकांचा वेळ, गाडी भाडे अथवा पेट्रोलचा खर्च हे सर्व वाचेल. शिवाय रुणालयातील गर्दीमुळे होणार्या संसर्गाची शक्यता कमी होईल. एक रुग्ण बाहेर जाणे व दुसरा आत येणे यातला वाया जाणारा डॉक्टरांचा वेळ वाचेल. ज्या रुग्णांना तपासायलाच पाहिजे त्यांना जास्त वेळ देता येईल, असे अनेक फायदे होऊ शकणार्‍या  टेलिमेडिसिन साठी संमतीपत्रक देणे आणि घेणे महत्वाचे आहे म्हणून हा लेखन प्रपंच..! सोबत संमतीपत्र कसे असावे याचा मसुदा दिला आहे. तो वाचल्यावर बहुतेक वरील  बाबी जास्त स्पष्ट होतील. त्यासंबंधी शंका कृपया विचाराव्यात म्हणजे त्यांची उत्तरे देता येतील, आणि टेलिमेडिसिनचा वापर वाढण्यास मदत होईल. 


टेलिमिडिसिन साठी संमतीपत्राचे महत्व : फेसबुक लाईव्ह रेकॉर्डिंग आपण येथे बघू शकता.
सहभाग : डॉ राजीव जोशी, डॉ शुभांकर नांदखेडकर, डॉ. जुन्नरकर
YouTube link:
https://www.youtube.com/watch?v=ndGztC7Ebwg

डॉ. राजीव जोशी

एम . बी. बी. एस. , एम.  डी. , एल. एल. बी.


Monday, October 4, 2021

राईड



आजकाल लहान मुलांना रडवू नका, हवं ते द्या असा ट्रेंड आहे कारण आई वडिलांकडे पैसा आहे आणि मुलांसाठी वेळ नाही. त्यामुळे मुलांना "नाही" हा शब्दच माहीत नाही.

मी पालकांना सांगतो, ५०० रुपयांची वस्तू गरज असेल तर द्या पण ५ रुपयांची वस्तू गरज नसेल तर " मिळणार नाही" हे सांगा आणि आजी आजोबा आई बाप यांनी एकमताने मुलाला "नाही" याचा अर्थ शिकवा.
१० वीतली एक मुलगी स्कूटी हवी म्हणून हट्ट करत होती. आई वडिल सांगत होते की १० वी पास झाल्यावर देऊ. हिने आत्महत्या करण्यची धमकी दिली.
आई माझ्याकडे येऊन म्हणते
"तुमच्या रुग्णालयात जन्माला आलेली ही मुलगी अशी कशी वागते बघा?"
ती मुलगी १५ वर्षे माझ्याकडे उपचार घेत होती म्हणून मी तिला बोलावून घेतले, आणि विचारले की आई परीक्षेनंतर देईन म्हणत्येय ना?
ती म्हणाली नाही दिली तर?
ठीक आहे, मग मी देईन..माझ्यावर तरी विश्वास आहे ना?
नाही मला आईनेच दिली पाहिजे.
अग, पण आत्महत्या कशाला करायची?
माझ्या मैत्रीणींकडे आहे आणि माझ्याकडे नाही...
मग मी विचारले कशी आत्महत्या करणार?
कांपोझ च्या १० गोळ्या खाऊन.
किती रुपयांना मिळतात?
२० रुपयांना.
मी तिला ५० रुपये काढून दिले आणि म्हणालो २५ गोळ्या आण.
कशाला?
१० तुला आणि १५ तुझ्या आईला.
तिला कशाला?
तू आत्महत्या केल्यावर आई काय करेल असे तुला वाटते?
अहो काका असे का म्हणताय?
अग. दोघींने इथेच गोळ्या खा म्हणजे माझा घरी येऊन डेथ सर्टिफिकेट द्यायचा त्रास वाचेल.
नको हो काका.
सिस्टर तुम्हीच जाऊन २५ गोळ्या आणा
काका, नको हो
सिस्टर जा तुम्ही.. हे घ्या ५० रुपये.
अहो काका मी खरच आत्महत्या करीन असे तुम्हाला वाटले का?
अग अत्ताच म्हणालीसना..
नाही हो, मी आईला घाबरवायला म्हणाले ..
मग आता गपचुप पणे घरी जा, मी पोलिसांना फोन करुन ठेवणार आहे की या मुलीने माझ्या समोर अशी अशी धमकी दिली. परत तू असे काही बोललीस तर आई पोलिसांना कळवेल.
..
न पेक्षा दहावी पास झालीस की माझ्याकडे ये, मी तुला स्कूटीसाठी पैसे देतो.
..

..
..
दहावी पास झाल्यानंतर ती मुलगी स्कूटीवर पेढे द्यायला आली आणि तिने मला स्कूटीवर राईड घ्यायला लावली..!!