Wednesday, March 15, 2017

वैद्यकीय अपघात विमा : काळाची गरज


     हल्ली वर्तमानपत्रांमधे अथवा निरनिराळ्या दूरदर्शन वाहिन्यांच्या ब्रेकिंग न्यूज मधे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर हल्ला करून तोडफोड केली आणि डॉक्टरांना मारहाण केली अश्या बातम्या वारंवार पहायला मिळतात. डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत, डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला अशी कारणे ह्या तोडफोड गटातील व्यक्ती देताना आढळतात, पण प्रत्यक्षात उपचारांदरम्यान नक्की काय घडले याची माहिती घेताना / देताना फार थोडे वार्ताहर आढळतात.


       ग्राहक संरक्षण कायद्याखाली वैद्यकीय व्यवसाय येऊन आता सुमारे २० वर्षे झाली. या काळात निरनिराळ्या स्तरावरील म्हणजे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय ग्राहक मंचा समोर येणार्‍या डॉक्टरांविरुध्दच्या खटल्यांचा अभ्यास केल्यास सुमारे ९० टक्के डॉक्टरांविरुध्द आरोप सिध्द होत नाहीत. याचे मुख्य कारण निष्काळजीपणा सिध्द करणे खूप अवघड आहे. डाव्या ऐवजी उजव्या बाजूची शस्त्रक्रिया केली एवढा ठळक बेजबाबदारपणा असेल तरच रुग्णाच्या बाजूने निकाल दिला जातो. सोनोग्राफी करताना दोन्ही हात-पाय व्यवस्थित आहेत असा रिपोर्ट दिल्यानंतर, जन्माला आलेल्या बाळाला एकच हात होता असे आढळले; त्या वेळी न्यायालयाने डॉक्टरांना शिक्षा सुनावली. पक्षाघातासाठी आय. सी. यू. त दाखल केलेल्या आपल्या वडिलांवर, उपचार करणार्‍या डॉक्टरांच्याकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला; असा आरोप करणार्‍या डॉक्टर महिलेलासुध्दा कोर्टात हार पत्करावी लागली, कारण स्वत:ला वैद्यकीय ज्ञान असूनही ती आरोप सिध्द करु शकली नाही.

      वरील दोन्ही उदाहरणांत डॉक्टरांना मानसिक छळ सहन करावा लागला, वकिलांवर पैसे खर्च करावे लागले, स्वत:ची प्रॅक्टीस सोडून कोर्टाच्या वार्‍या कराव्या लागल्या हे खरे आहे. पण असा त्रास रुग्णाच्या नातेवाईकांना सुद्धा होतोच आणि ९० टक्के वेळा निकाल डॉक्टरांच्या बाजून लागतो. डॉक्टरांच्या बाजूने लागलेल्या निकालांना वर्तमान पत्रात प्रसिद्धि मिळत नाही आणि वाहिन्यांवर टीआरपी ही मिळत नाही. १० टक्केच निकाल रुग्णांच्या बाजूने लागत असल्यामुळे बहुतेक नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळत नाही. 

      डॉक्टरांच्या बाजूने लागणार्‍या निकालांची वर्गवारी करता मोठ्या प्रमाणात आजाराचे पर्यवसान मृत्यूत होण्याची संख्या सर्वात जास्त आहे. जन्माला आलेला प्रत्येक मरणारच आहे. प्रत्येकाच्या नातेवाईकाने डॉक्टरांना दोष देण्यात काहीही शहाणपणा नाही. कुणीतरी डॉक्टरांविरुध्द कोर्टात जा असे सांगीतले, किंवा वकीलाने केस घेतली म्हणजे डॉक्टरांविरुद्ध आरोप सिध्द करता येईल असे नाही. तसेच आपण पैसे खर्च केले म्हणजे रुग्णाला आराम मिळेलच असे मानणे चुकीचे आहे. उपचाराला साथ देण्यासाठी रुग्णाची शारिरिक आणि मानसिक स्थिती खूप महत्वाची असते. बहुतेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर आजाराच्या गांभिर्याविषयी कल्पना देतात पण नातेवाईक उपचार चालू ठेवण्याचा आग्रह धरतात.  

या नंतरची वर्गवारी वैद्यकीय अपघातात मृत्यू होणे अथवा इजा होण्याची आहे. माझ्या दवाखान्याच्या उद्घाटनानंतर पंधराव्या दिवशी पेशंटला दिलेल्या पेनिसिलिनच्या टेस्ट डोसला रिएक्शन आली आणि पंधरा दिवसात जमा झालेले सगळे पैसे त्या रिएक्शनच्या उपचारांसाठी मी खर्च केले. सुदैवाने पेशंट दगावली नाही अन्यथा मला गाशा गुंडाळावा लागला असता. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी माझे आभार मानले, हल्ली नातेवाईक ग्राहक न्यायालयात जातात. पण हा वैद्यकीय अपघात आहे हे कोणी लक्षात घेत नाही. 

वैद्यकीय अपघात म्हणजे काय ते समजावून घेण्यापूर्वी अपघात म्हणजे काय ते बघू. भारतीय दंडविधान क्र ८० प्रमाणे अपघाताची व्याख्या पुढील प्रमाणे. 

      गुन्हेगारी उद्देश अथवा प्रव्रुत्ती नसलेल्या व्यक्तीने कायदेशीर काम कायदेशीर पध्दतीने कायदेशीर साधनांचा वापर करून योग्य काळजी आणि खबरदारी घेऊन करताना अकस्मिकरित्या दुर्दैवाने घडलेल्या घटनेला अपघात असे संबोधले जाते.

वैद्यकीय अपघाताची अशी व्याख्या कायद्याच्या पुस्तकात कोठेही लिहिलेली नाहे, अगदी अमेरिका किंवा ब्रिटनमधेही..!! परंतू आपण एक व्याख्या तयार करू.

     आवश्यक असलेल्या भूलेखाली अथवा भूलेशिवाय केली जाणारी, नियोजित वैद्यकीय प्रक्रिया अथवा शल्यचिकीत्सा, सहन होईल याचे उचित पध्दतीने मूल्यांकन केलेल्या रुग्णाचे; अकस्मिकपणे, अकल्पितपणे, अचानक, निर्हेतुक निधन झाल्यास (मानवी अवयव रोपण कायद्यानुसार) अथवा रुग्णाच्या मेंदूला अथवा इतर अवयवांना इजा झाल्यास या घटनेची कारणमिमांसा करता येत नसेल, अथवा घटनेला रुग्णाच्या शरीराचा असामान्य प्रतिसाद कारणीभूत असेल, अथवा रुग्णाच्या आजाराचे पर्यवसान अश्या घटनेत सहसा होत नसेल, अथवा रुग्णालय अथवा तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली नसेल, अथवा शवविच्छेदनानंतरही मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसेल तर त्या घटनेला वैद्यकीय अपघात असे संबोधणे योग्य ठरेल.

उदाहरणार्थ : जादा रक्तस्त्राव, जंतूबाधा, हृदय बंद पडणे, फुफ्फुसात रक्ताची गुठळी अडकणे इत्यादी.

  अश्या प्रकारच्या घटना दुर्दैवाने घडतात, पण सुदैवाने त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. अश्या घटनांकडे अपघात म्हणून पहाणे आवश्यक आहे.

यानंतर येणारा गट म्हणजे उपचार करताना होणारी गुंतागुंत. प्रत्येक शत्रक्रियेचा अभ्यास केल्यास त्यामधे काही गुंतागुंत होणे शक्य असते आणि त्या गुंतागुंती होऊ नयेत म्हणून डॉक्टर प्रत्यत्न करत असतात. तरीही गुंतागुंत झाल्यास तो डॉक्टरांचा निष्काळजीपणा नसून त्याला जास्तीत जात चूक म्हणता येईल. या पैकी काही अपघात या सदरात मोडू शकतात. काही रुग्णांच्या बाबतीत डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला असे कोर्टात सिद्ध होऊन रुग्णांना / नातेवाईकांना  नुकसान भरपाईसाठी आर्थिक मोबदला मिळतो. त्यासाठी डॉक्टरांनी विमा उतरवलेला असतो. परंतू वैद्यकीय अपघातांसाठी डॉक्टरांना अथवा रुग्णांना कोणत्याही प्रकारचा विमा उपलब्ध नाही.

रस्त्यावर येणार्‍या प्रत्येक वाहनाचा विमा काढला जातो, पण त्यातील काहीच वाहनांना अपघात होतो. वैद्यकीय अपघातांचे प्रमाण त्यापेक्षाही खूप कमी आहे. सध्या रेल्वेमधून प्रवास करणार्‍या प्रत्येक प्रवाश्याच्या तिकीटात रु. १०/= वाढवून विमा काढला जातो.  दररोज धावणार्‍या रेल्वे गाड्यांचा विचार करता अपघाताचे प्रमाण खूप कमी आहे. विमानाने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना आपला विमा उतरवण्याची मुभा ऑनलाईन तिकीट काढणार्‍या संकेतस्थळांवरून दिली जाते. त्याच प्रमाणे नियोजित वैद्यकीय प्रक्रिया अथवा शल्यचिकित्सा करण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाला अश्या पध्दतीने विमा उतरवता आल्यास वैद्यकीय अपघातांमुळे होणार्‍या नुकसानीची भरपाई नक्कीच करता येईल.

अश्या प्रकारच्या विम्यासाठी अडचणी काय आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे.

१)  मुळात कोणत्याही प्रकारचा विमा असणार्‍या व्यक्तींची (वाहनांची नव्हे) संख्या खूप कमी आहे, त्यामुळे वैद्यकीय अपघात विमा या संकल्पनेचा प्रसार आवश्यक आहे.
२)  आरोग्य विमा म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी होणार्‍या खर्चासाठी विमा फक्त ५ ते ७ टक्के लोकांकडेच आहे म्हणून हा विमा खूप महाग आहे.
३)  आजारी व्यक्तीला वैद्यकीय प्रक्रिया अथवा शल्यचिकित्सेसाठी विमा देणे ही खूप मोठी जोखीम आहे.
४)  वैद्यकीय अपघात आणि निष्काळजीपणा यामधील फरक डॉक्टरांना समजतो पण रुग्णांना तो समजावून सांगणे अवघड आहे.
५)  हे सर्व समजावून सांगायला डॉक्टरांकडे वेळ आहे का, आणि त्यावेळी रुग्ण तो समजावून घेण्याच्या मनस्थितीत असतात का हा खरा प्रश्न आहे.
६)  आपल्याला वैद्यकीय प्रक्रिया अथवा शल्यचिकित्सेची गरज न पडल्यास वैद्यकीय अपघातासाठी कोण कशाला विमा उतरवेल?
७)  अपघात झाल्यास तो रुग्णालयात होत असल्यामुळे रुग्णालयानेच असा विमा का उतरवू नये, रुग्णाचा काय संबंध?
८)  समजा विमा उतरवायचाच असेल तर तो केंव्हा आणि कसा उतरवणार? पैसे कोणी कोणाला द्यायचे आणि पॉलिसी कोण कोणाला देणार?
९)  वैद्यकीय अपघातात मृत्यू झाल्यास पुढील प्रक्रिया किती वेळात होणार?
१०)  यासाठी डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना सहकार्य करतील का? 
११)  रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा खटला लावू शकतील का?

      वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास वैद्यकीय अपघात विमा नक्कीच उतरवता येईल. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून या अडचणी सोडवण्यासाठी खालील पर्यायांचा विचार करता येईल.
१)  सर्व रुग्णालयांमधे हा विमा उपलब्ध केल्यास रुग्णांना याची माहिती मिळेल.
२)  वैद्यकीय प्रक्रिया अथवा शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या सर्व रुग्णांचा विमा उतरवल्यास असा विमा स्वस्तात मिळेल (उदा रेल्वे प्रवास विमा)
३)  आजारी व्यक्तीच्या उपचाराची जोखीम रुग्ण आणि डॉक्टर दोघेही उचलतात. ऑपरेशन टेबलवरच मृत्यू येईल अश्या किंवा अती गंभीर आजाराने त्रस्त रुग्ण सोडल्यास इतरांचा विमा उतरवणे विमा कंपनीला शक्य आहे. विम्याच्या हप्त्याच्या रकमेत रोगनिदानप्रमाणेच इतर आजारांमुळे फरक पडेल हे मात्र नक्की.
४)  उपचारापूर्वी डॉक्टरांनी रुग्णाला माहितीपत्रक देऊन वैद्यकीय अपघातासंबंधी प्रबोधन करणे शक्य आहे.
५)  रुग्णाच्या नातेवाईकांपैकी तरुणांना माहितीच्या मायाजालावरील योग्य दुवे पाठवून डॉक्टरांचा वेळ आणि रुग्णाच्या मनस्थितीचा प्रश्न सोडवता येईल.
६)  वैद्यकीय प्रक्रिया अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता निर्माण झाल्यानंतरच विमा प्रकिया सुरु करता येईल. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी केलेल्या तातडीच्या शस्त्रक्रियांना विमा देता येणार नाही.
७)  शस्त्रक्रिया रुग्णालयात होत असली तरी आपापल्या मिळकतीनुसार त्याच्या त्याच्या आयुष्याची किंमत तो तो रुग्णच ठरवत असतो आणि त्या प्रमाणे विम्याचा हप्ता ठरतो. म्हणून वैद्यकीय अपघात विम्याशी रुग्णालयापेक्षा रुग्णाचा संबंध जास्त आहे.
८)  रुग्णाची वैद्यकीय प्रक्रिया अथवा शस्त्रक्रिया ठरल्यावर रुग्णालयाने रुग्णाची आवश्यक माहिती विमा कंपनीला ऑनलाईन पद्धतीने देऊन काही रकमेपर्यंतचा विमा (उदा ५ लाख) उतरवण्यासाठी पैसे भरावेत आणि त्याहून अधिक रकमेचा विमा हवा असल्यास त्यासाठी पैसे भरण्यासाठी रुग्णाला / नातेवाईकांना ईमेल करावी. 
९)  दुर्दैवाने वैद्यकीय अपघात झाल्यास डॉक्टर/ नातेवाईक विमा कंपनीला कळवतील आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थित पोलिसांमार्फत शवविच्छेदनासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करतील. डॉक्टर, रुग्ण यांचा जबाब आणि शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यावर वैद्यकीय अपघातासाठी काढलेल्या विम्याची रक्कम नातेवाईकांना मिळेल
१०)  वैद्यकीय अपघातासाठी काही रकमेपर्यंतचा विमा रुग्णालयानी उतरवलेला असल्यामुळे आणि रक्कम डॉक्टरांच्या जबाबानंतरच मिळणार असल्यामुळे डॉक्टर आणि नातेवाईक एकमेकांशी सहकार्य करतील.
११)  वैद्यकीय अपघातासाठी विमा रक्कम घेतल्यांतरही नातेवाईक निष्काळजीपणाचा दावा लाऊ शकतील, परंतू त्यापूर्वी घेतलेली रक्कम विमा कंपनीला परत करावी लागेल. अपघात आणि निष्काळजीपणा या दोन्हीसाठी दावा करणे चुकीचे ठरेल.

डॉक्टर आणि पेशंटमधील बिघडलेले नाते सुधारण्यासाठी डिजिटल इंडिया मधे अश्या प्रकारचा वैद्यकीय अपघात विमा नक्कीच उपयोगी ठरेल..!!

डॉ. राजीव जोशी
9822084614

Please submit your response on the link below :

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUTVZHCVTY9h-eEhFMEbIEhekhJDxZuuwooXcuYPwR40X88w/viewform

3 comments:

Anonymous said...

डॉ​. राजीव जोशी, नेहेमीप्रमाणे अत्यंत महत्वपूर्ण, आवश्यक आणि अभ्यासपूर्ण वैद्यकीय विश्वातील सत्य पण उपयुक्त असे विवेचन.असेच लेखन अनुभवी नजरेतून व धारदार लेखणीशस्त्रातून कायम होत रहावे अशी सदीच्छा जी सर्वसमाजास उपयुक्त व प्रेरणादायक​ ठरावी.समज-गैरसमज दूर व्हावेत व डॉक्टर-रुग्णातील नाते न सुद्ध्रुड होण्यास हात-भार लागेल.तुझे विशेष कौतुक व अभिनंदन आजच्या वाढदिवशी..

jyotsna said...

Very well thought and put up.
Hope many people understand and support this.
Pl include reactions to vaccines and progression of illness in spite of timely correct diagnosis e.g.Staphylococcal pneumonia,complications of viral illnesses.
Also need to consider presence of Diabetes, Heart disease,alcoholism,Nicotine in any form, AIDS,are going to complicate any illness as it will be by AGING!

Unknown said...

RA DI you have hit the bulls eye. I have a lot to say on this issue.we can meet whenever you have free time. Insurance companies,Health department & the Hospitals have to come together on a comman platform to resolve this issue.