Tuesday, June 21, 2016

सोनोग्राफी बंद

सोनोग्राफीकेल्यांतर भरावयाच्या एफ फॉर्म मधील किरकोळ चुकांसाठी डॉक्टरांवर खटले भरुन त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या कारवाई विरुद्ध्द डॉक्टरांनी संप पुकारला.

त्या विरुध्द भूमिका मांडताना लोकसत्ताचे मुख्य संपादक मुकुंद संगोराम आणि महाराष्ट्र टाईम्सचे वैद्यकीय वार्ता विषेशज्ञ मुस्ताफा अत्तार यांनी आपापल्या वर्तमान पत्रांमधून डॉक्टरांवर कडाडून टीका केली.

त्या अनुषंगाने मी दिलेल्या उत्तरांचे एकत्रीकरण खाली केले आहे.  

मुकुंद संगोराम जी,
आजच्याच लोकसत्ता या वृत्तपत्रात आलेल्या संपदा सोवनी यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. वैशाली जाधव यांनी आपण स्टिंग ऑपरेशन करु शकत नसल्याची कबुली दिलीली आहे.
आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरुण घालण्यासाठीच त्या किरकोळ चुकांसाठी कायदा पुढे करुन डॉक्टरांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा तबडतोब राजिनामा देणे आवश्यक आहे.
घटकाभर आपण धरून चालू की डॉ. वैशाली जाधव करत आहेत ते १००% बरोबर आहे. सामान्य डॉक्टर कायद्याविरुध्द सरकारशी भांडू शकत नाही. त्यामुळे तुरुंगात जाणे किंवा सोनोग्राफी थांबवणे असे दोनच पर्याय डॉक्टरांपुढे उभे आहेत.
सोनोग्राफी केंद्रे बंद केल्यामुळे ज्या रुग्णांचे हाल होत आहेत त्यांनी कृपया डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे, महापालिकेच्या रुग्णालयांमधे, अथवा ससून रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी करून घ्यावी. या सर्व ठिकाणी सोनोग्राफी चालू आहे.
सोनोग्राफी चे रिपोर्ट ऑनलाईन नोंदवण्याच्या संगणक प्रणालीतील चुका मी लेखी स्वरूपात निदर्शनास आणल्यामुळे डॉ. वैशाली जाधव यांना राग आला. मी अनेक वेळा ईमेल पाठवूनही माझ्या केंद्राच्या दूरध्वनी आणि पत्यामधील "किरकोळ" चुका महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी दुरुस्त केल्या नाहीत हे दाखवून दिल्यावर त्यांनी माझ्यावरच त्या चुकांचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. मी त्याला बधत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या एफ फॉर्म मधील किरोकोळ चुकांसाठी मला तुरुंगात का पाठऊ नये असा प्रश्न उपस्थित केला.
जणूकाही त्यांच्या मेहेरबानीमुळेच माझ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही..!! तरीही महानगरपालिकेच्या विक्षिप्त आणि अरेरावीच्या वागणुकीला कंटाळून माझ्या रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र मी स्वत:च बंद करून माझ्यापुरता हा प्रश्न सोडवला आहे. उदरनिर्वाहासाठी सुदैवाने मी सोनोग्राफीवर अवलंबून नाही. पण ज्या डॉक्टरांनी प्रचंड गुंतवणूक करून सोनोग्राफी केंद्र चालू केले त्या डॉक्टरांनी तुरुंगात जाण्याऐवजी संपावर जाणे पसंत केले हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
आपण येथेच चुकत आहात हे कृपया लक्षात घ्यावे.
एफ फॉर्म भरण्यामधील तृटींमुळे तुरुंगात जाण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांसमवेत डॉक्टर घरी राहणे पसंत करत असल्यास त्यांची काय चूक आहे याबद्दल मार्गदर्शन कृपया आपण करावे ही नम्र विनंती.
डॉ. राजीव जोशी

पेशंटना वेठीस धरणे योग्य आहे ? अश्या मथळ्याखाळी मुस्तफा अत्तार म्हणतात...

शहरातील रेडिओलॉजिस्टनी संपाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. एका डॉक्टरवर झालेल्या कारवाईनंतर ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यातील त्रुटी आणि सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात असलेला राग या निमित्ताने पुन्हा बाहेर पडला. मात्र, कायद्यातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसून सामान्य पेशंटना सुविधेपासून वंचित ठेवणे हे कोणत्या कायद्यात बसते, यावर रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांनी आत्मचिंतन करायला हवे.



पेशंटना वेठीस धरण्याचा मुद्दा उपस्थित करून प्रत्येक वेळी डॉक्टरांना वेठीस धरण्यात येते.

आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलत होतो की खाजगी वैद्यकीय महाविद्यालये काढू नका, वैद्यकीय महाविद्यालयात असताना त्यासाठी संप केला होता. पण राजकारण्यांच्या हितासाठी खाजगी वैद्यकीय महाविद्यालये काढली गेली. आता २५-३० वर्षांनी समाजाला जाग आली आणि शेवटी या महाविद्यालयांतील प्रवेश राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश प्रक्रियेतून घ्यावी असा निर्णय सुप्रीम कोर्टाला ग्यावा लागला.

वैद्यकीय व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायदा लावू नका, असे सांगून आमचा घसा कोरडा पडला पण ग्राहक संघटनांनी आपले म्हणणे खरे केले आणि मते मिळवण्यासाठी शतमूर्ख राजकारण्यांनी त्यांची री ओढली. परिणाम असा झाला की प्रत्येक रुग्णाचे निदान सिध्द करण्यासाठी आणि त्याच्या शस्त्रक्रियपूर्वी करावयाच्या तपासण्यांची यादी मोठी झाली (ज्यायोगे डॉक्टर आपली बाजू खबीरपणे सिध्द करु शकेल). ९५% खटले रुग्णांच्या विरोधात निकाल लागत असतानाही वकील मंडळी रुग्णांना ग्राहक मंचासमोर जायला सांगतात आणि ते सुध्दा १ कोटीच्या वरचा दावा..!! यात कल्याण फक्त वकीलांचेच झाले. रुग्णाचे पैसे खर्च आणि डॉक्टरला मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय. डॉक्टरांनी सोयिस्कर रित्या रुग्णात तोडीही गुंतागुंत असेल तर मोठ्या रुग्णालयाची वाट दाखवायला सुरुवात केली, रुग्णाचा खर्च अजून वाढला. छोट्या रुग्णालयात ५०,००० मधे होणार्‍या सिझेरियन सारक्या नेहमी होणार्‍या शस्त्रक्रियांनासाठी मोठ्या रुग्णालयात १,२५,००० पासून २,५०,००० पर्यंत खर्च होतो, पण रुग्णाच्या बाजूने ग्राहक संघटना मात्र उभी रहात नाही. संघटनेचे काम डॉक्टरांचा विरोध आहेना..!!

आता ग्राहक संघटना डॉक्टरांविरुध्द उभ्या राहिल्या आहेत. डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा द्यायलाच हवी, संपावर जाता कामा नये. म्हणजे हे ग्राहक आपल्या मुलाचे लिंग जाणून घेण्यासाठी डॉक्टरवर दबाव आणणार, आणि कामच करत नाही म्हटले तर सामाजिक दबाव आणणार. आणि या ग्राहकांना शिक्षा काय? तर काहीच नाही..!! अरुण गद्र्यांसारखे डॉक्टर समाजासमोर डॉक्टरांविरुध्द बोलून सवंग प्रसिद्धि मिळवणार आणि आय एम. ए. सारख्या संस्थेकडे माफी मागणार.. शिक्षा काय .. काहीच नाही..!!! किती लोकांनी स्त्री भ्रूणहत्या केली? १००० मागे किमान १००. किती गर्भवती स्त्रिया, त्यांचे नवरे अथवा सासू सासर्‍यांना शिक्षा झाली? लाखात एक सुद्धा नाही. स्त्री भृणहत्येमधे मुख्य दोषी कोण आहे? डॉक्टर की समाज? मग आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी रामेशव्री असा उपाय काय कामाचा?

प्रत्येक गर्भवती महिलेची नोंदणी करून तिला मुलगा का मुलगी सांगून टाकावे आणि तिची माहिती कायम स्वरुपी उपलव्ध करावी हा मनेका गांधीचा उपाय जास्त योग्य आये. डिजिटल इंडियात स्त्रीभृण हत्या रोखायची असेल तर प्रत्येक गर्भाची नोंद करून गर्भपात कोणी केला, कधी केला, का केला, कसा केला, कुठे केला या माहितीबरोबरच महिलेने धनुर्वाताची लस घेतली का नाही, लोहाच्या गोळ्या घेतल्या का नाही, तिला डायबेटीस, ब्लडप्रेशर सारखे इतर काही आजार आहेत का वगैरे सर्व माहितीचे संकलन केल्यास स्त्रीभृणहत्या रोखण्याबरोबरच स्वस्थ इंडियाचे स्वप्न हळूहळू साकार होताना दिसेल. पण हे करणार कोण? कोणीच नाही..!! आणि न करणार्‍या शासकीय अधिका र्‍यांना शिक्षा काय? काहीच नाही..!!

मुस्ताफा अत्तार यांच्यासारखे नावाजलेले पत्रकार डॉक्टरांच्या विरोधात भूमिका घेतात हे पाहून आश्चर्य वाटते. त्यांचा मताच्या विरुद्ध भूमिका छापण्याची हिंमत किती वर्तमानपत्रे दाखवतात हे पहायला हवे. लेखकाच्या न्याय-वैद्यकीय पार्धभूमीसाठी वाचा शह आणि काटशह...

Monday, February 29, 2016

रक्ताचा तुटवडा कृत्रिम आहे काय?

दिनांक १० जून रोजीच्या सकाळ मधे रक्ताच्या बाटलीची किंमत वाढल्याची  बातमी वाचली. २००७ मधील ८५० रुपयांपेक्षा २०१४ मधे रक्ताच्या पिशवीची किंमत जास्त असणे स्वाभाविकच आहे. परंतू महागाईच्या वाढत्या निर्देशांकानुसार रक्ताची किंमत वाढवणे आणि रक्तावरील तपासण्यांसाठी अधिक रक्कमेची अपेक्षा असणे या दोन गोष्टी आक्षेपार्ह वाटतात.

कोणत्याही व्यवसायात, मग तो धर्मादाय असो किंवा बाजार असो, काही खर्च हे अत्यावश्यक असतात. प्रथमत: आस्थापन खर्च, कच्चा माल, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, आणि तयार मालाचे विपणन करण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि मनुष्यबळ यांची बेरीज  केली की जो आकडा येतो तो उत्पादन खर्च. त्यात निरनिराळे कर आणि फायदा मिळवला की विक्रीची किंमत ठरते.

बहुतेक सर्व रक्तपेढ्या धर्मादाय संस्था म्हणून नोंदणी करताना आढळतात. तसेच लागणार्‍या  उपकरणांसाठी रोटरी, लायन्स, जायंटस अश्या सामाजिक संस्थांकडून तसेच सरकारकडून अनुदान मिळवून आपला आस्थपनाचा खर्च मिळवतात. लागणारा कच्चा माल त्यांना रक्तदात्यांकडून मोफतच मिळतो. (कायद्याने रक्तपेढ्यांना रक्त मिळवण्यासाठी पैसे देता येत नाहीत) रक्तदान हे महादान मानून अनेक व्यक्ती वारंवार रक्तदान करतात. आपल्या नातेवाईकाच्या आजारपणात रक्तदान करून, अनेकांनी मदत केलेली असेल. रक्ताची मागणी इतकी जास्त आहे की त्याचे विपणन करण्यासाठी काही खर्च करावा लागत असेल असे मला तरी वाटत नाही.  त्यामुळे रक्तपेढ्यांचा मुख्य खर्च हा रक्तावरील प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री आणि मनुष्यबळ याच्यावरच जास्त होतो. हा खर्च रुग्णाकडून घेणे रक्तपेढ्यांना क्रमप्राप्त आहे याबद्दलही कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे प्रश्न उरतो तो रक्तपेढ्या सांगतात तो खर्च  कमी आहे, योग्य आहे, का जास्त आहे?

रक्ताची पिशवी, आणि रक्त गोठू नये म्हणून लागणारे रसायन यांची किंमत रुपये ४०० इतकी असते. त्यावर गुप्तरोग, कावीळ आणि एच आय व्ही इत्यादी अत्यावश्यक तपासण्यांची किंमत १००० रुपये असल्याचे रक्तपेढ्या सांगतात. पण खाजगी रक्तपेढ्यांमधे १४०० रुपयांना मिळणारी रक्ताची पिशवी सरकारी रक्तपेढ्यांमधे मात्र १००० रुपायांना कशी मिळू शकते?

इतर जास्तीच्या पण रुग्णाच्या हितासाठी उपयोगी तपासण्यांसाठी येणारा खर्च रुपये १२०० असल्याचेही रक्तपेढ्या सांगतात. पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमधे सुद्धा या तपासण्या साधारण याच दरात केल्या जातात, आणि त्यापैकी कोणीही धर्मादाय असल्याचा आव आणत नाही.  किंबहुना या लॅबोरेटरीज आस्थापनाचा खर्च स्वत:च करतात आणि त्यातील काही, रुग्ण पाठवणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांना कमिशन सुध्दा देतात (विपणन खर्च) आणि तरीही फायदा कमावतातच..!! रक्तगट जुळणीसाठी सरकारी रक्तपेढीत १४० रुपये, तर खाजगी रक्तपेढीत २८० रुपये म्हणजे दुप्प्ट आकार..!! त्यामुळे या तपासण्यांमधे रक्तपेढ्याना नफा होत असावा असे म्हटल्यास वागवे ठरणार नाही.

अश्या रितीने मोफत मिळणारा कच्चा माल रुग्णापर्यंत पोचण्यासाठी १४०० ते २६०० रुपये खर्च करावे लागतात. तसेच या रक्तावर रेडिएशन प्रक्रिया केल्यास रक्तसंक्रमण अधिक सुरक्षित होते त्यासाठी आणखी १००० रुपये खर्च येतो, परंतू ही सुविधा सर्व रक्तपेढ्यांमधे उपलब्ध नाही.

या तपासण्यांसाठी लागणारी रसायने आणि मनुष्यबळ  यांचा खर्च रक्तपेढीच्या उलाढालीवरही अवलंबून असतो. परंतू सर्व रक्तपेढ्यांमधे एकसूत्रता असावी यासाठी सरकारने वरीलप्रमाणे दर ठरवून दिले आहेत. त्यामुळे वरीलप्रमाणे आकार घेण्यास कोणाचीही हरकत नसावी अशीरक्तपेढ्यांची अपेक्षा असते.

परंतू हे मांजराने डोळे मिटून दूध पिण्यासारखे आहे. एक तर जेंव्हा रक्ताची गरज असते त्यावेळी रुग्णाचे नातेवाईक घायकुतीला आलेले असतात. त्यातच दुर्मिळ रक्तगट असेल तर रक्तपेढ्या हात वर करून मोकळ्या होतात आणि नातेवाईकाना त्याच रक्तगटाचा रक्तदाता शोधायला सांगतात. काहीरक्तपेढ्यामधे रक्तदाता मिळवण्यासाठी मदत करणार्‍या व्यक्ती नेमलेल्या असतात ज्या अधिक पैसे घेऊन रक्तदाता मिळवून देतात. रक्तासाठी तोंडाला येईल ती, आणि नातेवाईकांना परवडेल ती किंमत वसूल केली जाते, थोडक्यात रक्ताचा बाजार केला जातो ही वस्तूस्थिती आहे. सरकारी दराची पावती आणि वर रोख रक्कम दिल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात अश्या गैरव्यवहारांचा पुरावा रहात नाही, आणि त्या वेळी गरज इतकी तीव्र असते की भ्रष्टाचाराकडे काणाडोळा करावाच लागतो नाहीतर मृत्यूशी गाठ असते. एक डॉक्टर असूनही  माझ्या नातेवाईकांच्या आजारपणात असे पैसे दिलेले आहेत.

रक्तपेढ्या संपूर्णपणे धंदेवाईकच आहेत ह्या माझ्या विधानाला पुष्टी देण्यासाठी, गरजेच्या वेळी रक्तदाता लवकर उपलब्ध व्हावा यासाठी मी स्वत: केलेले प्रयत्न आणि पुण्यातील रक्तपेढ्यांचा संघटनेने एकत्रितपणे त्यांना केलेला विरोध यांची  माहीती पुढे देत आहे.

माझ्या अनेक मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या शस्त्रक्रियेसाठी रक्त मिळवण्यात अडचणी आल्यामुळे, गेल्या ३-४ वर्षांपासून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर मी विचार करत होतो. मोबाईल फोनच्या वाढत्या उपयोगाचा वापर रक्तदात्यांपर्यंत पोचण्यासाठी कसा करता येईल या विचारातून मी व माझ्या मित्रांनी एक संकेतस्थळ तयार केले. माहितीच्या मायाजालास  मोबाईल SMS ची साथ देऊन आम्ही रक्तदात्यांपर्यंत पोचण्यासाठी केलेल्या संगणकप्रणालीला २०११ सालचा टेलीमेडिसीन सोसायटी ऑफ इंडिया चा पुरस्कार मिळाला. वर्तमानपत्रात आम्ही दिलेल्या निवेदनाला ५००० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला आणि मोबाईल फोन चा वापर करून आमच्या संकेतस्थळावर नावनोंदणी केली.  परंतू पुण्यातील एकाही रक्तपेढीने या संगणकप्रणालीच्या वापरासाठी नाव नोंदवले नाही. 

आम्ही पुण्याच्या रक्तसंक्रमण संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी यांच्या सहाय्याने या संस्थेच्या संमेलनात सादरीकरण केले आणि रक्तपेढ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. २४ रक्तपेढयांनी वर्षाला प्रत्येकी नाममात्र रुपये ५००० खर्च केल्यास पुण्यातील रक्ताचा तुटवडा कसा दूर करता येईल याचे सादरीकरण केले, परंतू रक्तपेढ्यांनी पैसे खर्च करण्यास असमर्थता व्यक्त केली. डॉ. वाणी यांनी संघटनेचे राष्टीय अध्यक्ष डॉ. युधबीर सिंग यांच्याकडे या प्रकल्पाला मदत मागण्यास सुचवले आणि त्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. त्यांनी पुण्यात होणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात मला सादरीकरण करण्यास सांगीतले आणि सादरीकरणाच्या शेवटी व्यासपीठावरून माझे कौतुक करून ताबडतोब माझी नियुक्ती संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर केली. त्यानंतर तीन वेळा दिल्ली येथे जाऊन मी कार्यकारिणीच्या निरनिराळ्या स्तरांवरील बैठकांमधे सादरीकरण केले.  १४ जून २०१२ रोजी या राष्ट्रीय प्रकल्पाची घोषणा झाली आणि पुणे, मुंबईच नव्हे तर कलकत्ता, मद्रास, हरियाणा मधून रक्तदात्यांनी या सूचीत आपले नाव नोंदवले. संपूर्ण भारतातून मिळालेल्या प्रतिसादामुळे शेवटच्या बैठकीत हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर राबवण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आणि लागणारा सर्व खर्च संघटनेने करण्यास मान्यता दिली. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुणे येथे डॉ. वाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्याचे ठरले आणि त्यासाठी पुण्यामधील रक्तपेढ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली.


या बैठकीत पुण्यातील रक्तपेढ्यांनी आपल्याकडील रक्तदात्यांची नावे रक्तदात्यांच्या राष्ट्रीय सूचीत नोंदवण्यास साफ नकार दिला. त्यांच्या मते इतर रक्तपेढ्या या सूचीचा गैरवापर करु शकतील त्यामुळे प्रत्येक रक्तपेढीची सूची वेगवेगळीच ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय संघटनेने प्रत्येक रक्तपेढी बरोबर एक करार करावा ज्यायोगे संगणक प्रणाली तयार करणे, माहिती साठा करणे, एस एम एस पाठवणे यासाठी लागणार्‍या खर्चाची जबाबदारी संघटनेने घ्यावी, पण रक्तपेढीची सूची फक्त त्याच रक्तपेढीला वापरता यावी. तसेच वर्तमान पत्रातून अथवा इतर माध्यमातून रक्तदातासूचीमधे नावनोंदणी करण्यासाठी संघटनेने  लोकांना आवाहन करावे आणि रक्तपेढीला गरज पडेल तेंव्हा संघटनेच्या या सूचीमधून रक्तदाता पुरवावा असे मुद्दे या करारात असावेत अशी चर्चा झाली. त्याप्रमाणे कराराचा एक मसुदा जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. कुलकर्णी यांनी तयार केला आणि तो राष्ट्रीय कार्यकारणीच्या अध्यक्षांना पाठवण्यात आला.

राष्ट्रीय कार्यकारिणीने असा कोणताही करार करण्यास विरोध केला, कारण गरज पडेल तेंव्हा रक्तदाता उपलब्ध होण्यासाठी तयार केलेल्या संगणक प्रणालीत; रक्तपेढ्यांनी सुचवलेल्या भिंती त्यांना मान्य नव्हत्या. तसेच खर्च संघटनेने करायचा आणि रक्तदात्यांवर रक्तपेढ्यांनी मालकी हक्क सांगायचा हे समीकरण कोणत्याही पदाधिकार्‍यांना मान्य नव्हते.
पुणे शहरातील रक्तपेढ्यांच्या, रक्तदात्यांवरील "हक्काच्या" भूमिकेमुळे पुणे शहर एका महत्वाकांक्षी प्रकल्पाला आणि रक्ताच्या तुटवड्यापासून मिळू शकणार्‍या मुक्तीला मुकले अश्या भावनेने मी या प्रकल्पातून अंग काढून घेतले.  यावरून रक्ताचा तुटवडा कृत्रीम असून रक्तपेढ्या त्यांच्या व्यवसायाकडे समाजसेवा म्हणून बघत नसून धंदा म्हणून बघत असल्याचे ध्यानात येते. 

Friday, January 22, 2016

भयंकर अनुभव

लेखिका :रुपाली पारखे देशिंगकर c/o ज़्योती कानिटकर  c/o फेसबुक
सोमवार, १८ जानेवारी, सकाळी ९.४५ ची वेळ. ठिकाण नेरळ रेल्वे स्थानक क्रमांक २. पहिल्या लेडीज डब्याजवळील ’सुलभ’? नामक स्त्रियांचे स्वच्छतागृह [?] . मी १० वाजताच्या मुंबईला परत येणाऱ्या गाडीची वाट पहात उभी असताना जोरदार वादावादीचे आवाज आले म्हणुन वळून पाहिलं. एक परिचीत ज्येष्ठ नागरीक महिला स्त्री प्रसाधन गृहाच्या दाराशी वाद घालताना दिसल्या. ज्येष्ठ नागरीक, त्यातुनही परिचीत म्हंटल्यावर मी त्यांना जाऊन विचारलं की "काय झालं"? मिळालेलं उत्तर भयानक तर होतच पण अतिशय अस्वस्थ करणारं होतं. नेरळ रेल्वे स्थानकावर असलेलं हे स्वच्छतागृह कंत्राटदाराला चालवायला दिलेले आहे. माथेरान येथुन येणारे हजारो पर्यटक, नेरळ येथील महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी व दररोज प्रवास करणारे प्रवासी अशांच्या सोयीसाठी या स्थानकावर हे स्वच्छतागृह आहे. रेल्वेने हे स्वच्छतागृह खाजगी कंत्राटदाराला चालवायला दिले असुन इथे स्वच्छतेची वानवा आहे. येथे असणारी कर्मचारी मुलगी येणाऱ्या सर्व स्त्रियांकडुन पाच रुपये आधी घेऊन मगच त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करायला देत होती. रेल्वेने जागोजागी युरिनल अर्थात मुत्रालये निशुल्क उपलब्ध ठेवली असताना त्यासाठी पाच रुपये का घ्यावे असा सवाल त्या आजींनी केल्यावर त्यांना आत जायला देणार नाही अशी अरेरावी ती मुलगी करत होती. अशी दांडगाई केल्याने,मी आजींना तिथेच थांबायला सांगुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. "या पाच रुपयाची पावती का फ़ाडत नाही तुम्ही"? असा प्रश्न विचारल्यावर अतिशय अर्वाच्य भाषेत या मुलीने बोलायला सुरुवात केली. "क्या मुतने का रसीट चाहिये"? असा निर्लज्ज प्रश्न तार स्वरात तिने विचारायला सुरुवात केली. त्या आजींनाही तिने हाच प्रकार करुन दाखवला होता. मी पैसे देते सांगुन आत गेले आणि त्या जागेचे हे फ़ोटो काढले. मुतारीच्या भांड्यात घाण साठलेली, आतल्या दाराला नसलेली कडी, स्वच्छतेच्या नावाखाली करंगळी एवढी पाण्याची धार सतत सुरु असलेला नळ, आत पडलेली विष्ठा आणि कचरा.... ह्या सगळ्यात निव्वळ शरीरधर्म पाळायला, लाजेने नाक मुठीत धरुन येणाऱ्या स्त्रिया असं भयानक चित्रं दिसुन आलं.
तिथे असणाऱ्या स्त्रियांना, मुलींना या बद्दल "तुम्ही काही बोलत का नाही"? असं विचारल्यावर, आम्हाला दररोज लांबुन यायचं असतं, जेव्हा अगदी नाईलाज होतो तेव्हा या जागेचा वापर आम्ही करतो, ओरडाआरडी करुन सांगतोय कुणाला ? नी आमचं ऐकतय कोण? अशी उत्तरं मला ऐकायला मिळाली. मी फ़ोटो काढतेय हे लक्षात आल्यावर त्या मुलीने "इधर से जाओ" असं ओरडायला सुरुवात केली. मी शुद्ध मराठीत, तिच्याकडे तिच्या कंत्राटदार एजन्सीच्या नावाची व आयकार्डची मागणी केली. "दो घंटेके बाद आओ, सब दिखाएगी मै" अशी उडवाउडवीची उत्तरं तिने द्यायला सुरुवात केली. "स्टेशन मास्तरकडे चल" असं सांगितल्यावर तिने स्पष्ट नकार दिला , का? तर तिची आई तिथे कर्मचारी असुन ती दुपारी येणार होती. प्रिती नाव असलेली ही मुलगी स्वत: कर्मचारी नसताना असे बेकायदा पैसे गोळा करणं अयोग्यच हे सांगितल्यावर तिने त्या आमच्याकडुन घेतलेले पाच रुपये अंगावर फ़ेकले आणि ओरडुन सांगितलं के "इधर से जाओ, धंदेका बरबादी मत करो. रंडीलोगोंको कुछ काम नही, सिर्फ़ हगनेमुतनेका रिसीट चाहिये." तिथे उभ्या असलेल्या कातकरी बायांनी सांगितलं की त्यांना तर या स्वच्छतागृहाच्या जवळपण फ़िरकु दिले जात नाही कारण त्यांच्याकडे पैसे नसतात. काही कॊलेजमधल्या मुलींनी सांगितलं की अशाच अर्वाच्च शब्दात ह्या बाया ओरडतात म्हणुनच कुणी बोलत नाही.
थंडीच्या दिवसात ज्येष्ठ नागरीकांना वारंवार स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. अशा वेळेस काय करावं? दोन दोन तासांच्या प्रवासात, गरज असल्यास शरीरधर्माच काय करावं? मुत्रालय किंवा शौचालय या सारख्या अगदी प्राथमिक गरजांसाठी जर स्त्रियांना स्वत:ला रंडी धंदेवाल्या असल्या शब्दांना सामोरं जावं लागत असेल तर काय करावं? मी ही पोस्ट मुद्दामहून लिहितेय. मी संदर्भात कुणाकडे तक्रार करावी ? या संदर्भात रेल्वेच्या कुठल्या विभागाला मी लिहावं हे मला प्लिज सांगावं. दररोज जरी पन्नास स्त्रियांकडून असे पाच पाच रुपये गोळा होत असतील तर दिवसाला अडीचशे रुपये देणारी ही स्वच्छतागृहं अस्वच्छ का? सुट्ट्यांमध्येतर शेकडो बायका इथे येतात. म्हणजे हा प्रकार चक्क मनी मिंटींग च आहे. या पोस्ट चे सेटींग मी पब्लिक ठेवलय म्हणजे ती सहज शेअर करता येऊ शकते. माझी विनंती की ही पोस्ट जरूर शेअर करा. बहुतांश स्टेशन्सवर हाच प्रकार होतो असं मला सांगण्यात आलय. प्रत्येकाच्या घरात स्त्री सदस्य असल्याने हा न टाळता येणारा प्रकार कधी ना कधी सहन करावा लागलेला असतोच. त्यामानाने महाग महाग ओरडुन आपण त्या पुणे मुंबई एक्स्प्रेस वेच्या मॊल्स ना नावं ठेवतो. पण तिथली स्वच्छतागृहे साफ़ तर असतात, पण पैसेही घेतले जात नाहीत तिथे. मी ही पोस्ट करुन गप्प बसणार नाहीए. नक्की शोधणार की हा प्रकार काय आहे? हेच जर अच्छे दिन असतील, तर आम्ही स्त्रिया कायम दीनच रहाणार.
This is a real happening, happened with me on Neral Railway Station this week. A private contractor's lady staff collects 5 Rs for urinal. If not paid, she does not allow ladies to get in. look at the pictures I clicked, the condition is horrible and unbearable. No clean commode , no water, dirt all around…. AND for this facility, if Rs 5 is not paid, this staff uses abusive language to the ladies addressing them as prostitutes. This is happening on weekdays, if it is holiday, hundreds of ladies face this problem. Do we need to fight for our basic right? These are the ACCHE DIN?