शाळेत चौथीत असतानाच्या फार थोड्या गोष्टी आठवतात. एक म्हणजे आम्ही फारच खट्याळ कार्टी होतो. मी, शिरिष भावे, आणि उपेंद्र कुलकर्णी नाटकात काम करण्याच्या नावाखाली वर्गाला दांडी मारायचो. एकदा शाळेच्या ग्राउंडवर पकडले गेलो. शिपायाने आम्हाला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले. चिंचोरे सरांना आम्ही सांगीतले की तेथे एका तारेला शॉक बसतो आहे म्हणून इतर कोणी हात लावू नये म्हणून राखण करत होतो.ते म्हणाले चला दाखवा कुठे ते. आम्ही एक विजेचा खांब आणि त्याला बांधलेली तार दाखवली. मुख्याध्यापकांनी शिपायाला सांगितले बघ शॉक बसतो का, तो म्हणाला असा कसा हात लावू ? मग त्याला राखण करायला सांगून मुख्याध्यापकांनी आम्हाला वर्गात पाठवले. पुढील थोड्या वेळात त्यांना आमची हुशारी कळली आणि तिघांनाही बडवून काढले..!!
त्यावेळी आपटे बाई वर्गशिक्षिका होत्या आणि त्या चिंचोरे सरांबरोबर स्कॉलरशिपच्या वर्गालाही शिकवायच्या. १९७० पूर्वीच्या पाच वर्षात शाळेतील एकाच विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत नाव मिळाले होते, गेली दोन वर्षे कोणालाच स्कॉलरशिप मिळाली नाही. त्यांची आमच्या वर्गाकडून फार अपेक्षा होती. पण वरील प्रमाणे उद्योग करत असल्यामुळे त्या खूप चिडल्या होत्या. त्यातच आम्हाला वार्षिक परिक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे त्यांनी माझ्या घरी येऊन आई वडिलांना सुध्दा सुनावले होते की आता हा काय दिवे लावणार वगैरे .. मी म्हणालो की स्कॉलरशिपच्या अभ्यासामुळे वार्षिक परिक्षेकडे दुर्लक्ष झाले. त्यावेळी शिक्षक आणि पालकांनी येथेच्छ प्रसाद दिल्याचे अजून आठवते.
पण मग स्कॉलरशिपचा निकाल लागला. मी व रामचंद्र जोशी अशी दुक्कल श्रेयनामावलीत होती. त्यावेळी दहापैकी शाळेचे दोन विद्यार्थी असे बहुदा पहिल्यांदाच झाले असावे. तो व मी दोघेही बरोबरच अभ्यास करायचो. आपटे बाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. उगीच तुला बडवले असे सारखे म्हणू लागल्या. मग माझ्या आईने त्यांची समजूत घातली की मुलांच्या चांगल्यासाठीच आपण त्यांना शिक्षा देतो. त्यानंतर अजून २० नावे जाहीर झाली त्यात शाळेतील पाच विद्यार्थी आले. आपटे बाई व चिंचोरे सरांच्या कष्टांचे चीज झाले.

No comments:
Post a Comment