Thursday, September 30, 2021

म. ए. सो च्या भावे प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

म. ए. सो च्या भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्यमोहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या माजी विद्यार्थी मेळाव्यांपैकी प्रथम मेळावा १९६० ते १९७५ मधे इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांसाठी दि २६/०९/२०२१ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळात शाळेच्या आवारात पार पडला. मुख्याध्यापक श्री खिलारे आणि सौ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या सर्व अध्यापिका, अध्यापक आणि सेवकवर्ग यांनी खूप परिश्रमपूर्वक समारंभाचे आयोजन केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. अत्यंत कल्पकपणे कार्यक्रमाची चार भागांमधे विभागणी करुन त्या प्र्त्येक भागाचे नियोजन कौशल्याने केल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन.

सर्वप्रथम नाव नोंदणी करतानाच आपण कोव्हिडच्या वातावरणात आहोत याची जाणीव करून देण्यासाठी सॅनिटायझरचे तीर्थ हातावर देऊन त्यानंतर कागदाच्या वेष्टनात गुंडाळलेला पेढा चमच्याने देऊन स्वागत करण्यात आले. नावनोंदणी झाल्यावर जवळच केलेल्या सेल्फी पॉइंटवर एकत्र येऊन एकएका वर्गातील विद्यार्थी ग्रुप फोटो काढण्यात मश्गुल झाले, त्यावेळापुरते काढण्यात आलेले मास्क बाकी सर्व कार्यक्रम भर लावलेले होते..!  सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांचा सह्या घेण्याची कल्पना सुरेख..!!

शाळा भरल्याची घंटा झाल्यावर सर्व विद्यार्थी आपापल्या चौथी उत्तीर्ण वर्षाप्रमाणे रांगांमध्ये उभे राहिले. बाईंनी   सांगीतले एक हात से नाप लो.. आणि शाळा सुरु झाली..!! राष्ट्रगीत,  प्रतिज्ञा,  प्रार्थना झाल्यावर सर्वांना जमिनीवर बसायला सांगितले. येथे वेगळेपण एव्हडेच होतेक की ज्यांना खाली बसणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी बाजूला खुर्च्या ठेवल्या होत्या.  विचारपूर्वक  नियोजनाच्या अनेक उदाहरणांपैकी हे एक.   

आजचा दिनविशेष होता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..!! प्राणायामानंतर  मुख्याध्यापकांनी आई वडिलांचे स्मरण करायला सांगीतले आणि आकाशातून अमृत वर्षाव (पाऊस) सुरु झाला. लगेच सर्व विद्यार्थांना सभागृहात जायला सांगून सर्व अध्यापक/ सेवक वर्ग त्वरेने तेथील व्यवस्था करण्यात कार्यरत झाला. ५ मिनिटांमधे सर्व विद्यार्थी स्थानापन्न झाले व कार्यक्रम पुढे सुरु झाला. अडचणींवर मात करणे आणि पुढे वाटचाल करणे हे शाळेने पुन्हा एकदा शिकवले..!!

सौ महाजन बाईंनी सर्व विद्यार्थांना त्यांच्यामागोमाग शाळेच्या  घोषणा द्यायला लावल्या आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

१,   २,   ३,  ४, भावेची मुले हुशार.. 

५,  ६,   ७,  ८, भावेची कॉलर ताठ

९, १०, ११, १२  भावेचा आहे दरारा....  

या  आरोळ्यांनी सभागृह दुमदुमले..!!

शाळेच्या गेल्या १२५  वर्षांच्या  इतिहासाची चित्रफीत भन्नाट झाली आहे. आपल्या शिक्षकांचे फोटो आणि नावे पाहून मन भरुन आले. उपस्थित राहिलेल्या वृध्द शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी केलेले "एक साथ नमस्ते" सर्वांना ५० वर्षांपूर्वीच्या शाळेत घेऊन गेले...!!

मुख्याध्यापकांनी शाळेच्या पुढील योजनांची माहिती दिली. शाळेची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

त्या नंतर दाभणात सुतळी ओवणे आणि म्हणी ओळखण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. २० मिनिटांमधे दोन खेळांचे आयोजन करुन सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यासाबरोबरच इतर कौशल्ये कशी विकसित केली जातात याची आठवण करुन दिल्याबद्दल  वेदपाठक सरांचे   मनापासून धन्यवाद..!!

त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणी सांगायचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात काहींनी पाल्हाळ लावला तर वेळे अभावी काहींनी आठवणी न सांगताच आटोपले त्यामुळे हा कार्यक्रम अजून चांगला करता आला असता एव्हडेच सांगेन. अर्थात यात संयोजकांचा दोष नसून सहभागी विद्यार्थी काळ काम वेगाची गणिते नीट शिकले नाहीत एव्हडेच म्हणावे लागेल. शाळेतील आजी विद्यार्थ्यांनी तयार केलीली भेटकार्डे माजी विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.

त्या नंतर झालेल्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या भाषणांचा वेळ कमी करून  विद्यार्थ्यांच्या आठवणींसाठी वेळ वाढवायला हवा.  पदाधिकार्‍यांच्या कामाबद्दल  एक पुस्तिका काढून ती सर्वांना दिल्यास जास्त योग्य होईल.  आलेल्या विद्यार्थ्यांपैकी   समाजोपयोगी कामे करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, त्यांच्या यशाबद्दल सर्वांना माहिती देणे जास्त महत्वाचे आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केल्यास  शाळेसाठी देणगी मिळवण्याचा कार्यक्रमाचा उद्देशही सफल होईल असे मला वाटते.

अर्थात हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे काही तृटी राहणे स्वाभाविकच आहे. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. तरीही विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी अजून वेळ दिल्यास जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शाळेला पोचता येईल. पंधरा वर्षांऐवजी ७ ते ८ वर्षांचे विद्यार्थी एका वेळी बोलवावेत. झूम, टीम्स इत्यादींचा वापर करुन परगावी / परदेशी रहात असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेता येईल.  गुगल फॉर्मवर नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नाव नोंदणी करायची गरज नाही. ज्यांनी आपली माहिती गुगल फॉर्मवर भरली नाही  त्यांना लिंक पाठवावी म्हणजे  शाळेकडे सर्व माहिती एक्सेल शीट मधे उपलब्ध होईल.  पुढील मेळाव्यापूर्वी वर्तमान पत्रांमधे बातमी येण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती. 

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित केलेल्या चहापानादरम्यान मित्रमंडळींशी केलेल्या चर्चेत पुढे आलेले मुद्दे वर दिलेले आहेत.  करोना काळातही सुंदर नियोजन करुन यशस्वी मेळावा भरवल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!

डॉ राजीव जोशी